दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे कुडासे गावातील शेतकर्यांचे सुपारी, नारळ, केळी, भात, काजू वगैरे फळबागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने कुडासे ग्रामस्थांनी ग्रा.पं. कार्यालयासमोर सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी या उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन येत्या दोन दिवसांत तिलारी प्रकल्प अधिकारी, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग व महसूल विभाग यांची संयुक्त बैठक लावून योग्य पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. कुडासे-भरपाल वाडीतील पाट व बंधारा अतिवृष्टीमुळे तसेच कालव्यातील पाणी थेट वॉलमधून बेसुमार सोडल्याने खचून गेला आहे. या पाटावर हजारो नारळ, सुपारी, केळी, भात वगैरे बागायती अवलंबून असल्याने पाट सिमेंट काँक्रिटने बांधून मिळावा, केळी बागायतींच्या नुकसान भरपाईसाठी खास प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे तहसीलदार यांना लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बागायतीत पुराचा भरमसाठ गाळ, चिकट माती साचल्यामुळे चालू वर्षाचे पूर्णच नुकसान झाले आहे. परंतु भविष्यात झाडांची आयुर्मर्यादा व उत्पन्नात घट होणार आहे. काजू बागायतीचे अतिवृष्टी व वादळामुळे नुकसानी झाली आहे. शेतकर्यांनी केलेली मशागत व मेहनत, भात शेतीचे नुकसान भरपाई इतर साग, मिरी वगैरे झाडांचे नुकसानी दरात सदर स्थितीत असलेला शासन दरात वाढ करून मिळावी, शेतकर्यांचे कृषी पंप, पंपाचे शेड, पाईपलाईन वाहून गेलेल्यांना नवीन कृषी पंप मिळावे. कृषी पंपाचे पंचनामे करून नुकसान द्यावे. शेतकर्यांना नुकसान देताना गाव नमुना सातबारा अंतिम न धरता शेतकर्यांचे शेतीचे पंचनामे अंतिम धरून ज्या शेतकर्यांचे पंचनामे प्रत्यक्षात झाले त्यांचे पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई मिळावी. शेतकर्यांना कर्जमाफी करावी, नारळ, सुपारी, केळी, भात, काजू वगैरे फळबागायती नुकसानीबाबत योग्य दर देऊन नुकसानी मिळावीत, आदी मागण्या या ग्रामस्थांच्या आहेत. या मागण्यांकरिता कुडासे गावातील शेतकर्यांनी कुडासे ग्रा.पं.समोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. संदीप कोरगावकर, दादा देसाई, रामदास मेस्त्री, हरी देसाई, राघोबा देसाई व अन्य उपस्थित होते.
