दापोली : दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर आहेत. रत्नगिरी येथे त्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे दापोली मतदारसंघात दळवी यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री भेटीवेळी माजी तालुकाप्रमुख शांताराम पवार तसेच माजी सभापती किशोर देसाई हे होते. सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आधीपासून दापोली मतदारसंघात रंगली होती; मात्र शिवसेनेचे कष्टाने बांधलेले घर मोडणार नाही, असे दळवी यांनी अनेक वेळा ठाम सांगत या पक्ष प्रवेशाला पूर्णविराम दिला होता. मात्र, दळवी आणि मुख्यमंत्री भेटीने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. 1990 साली सूर्यकांत दळवी यांनी दापोली मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांचा पराभव करून 25 वर्ष दापोली मतदारसंघावर वर्चस्व ठेवले. मात्र 25 वर्षात दापोली मतदारसंघात म्हणावा तसा विकास झाला नाही अशी अनेक दिवस दापोलीत ओरड होती. याला जोड म्हणून दापोलीतील शिवसेना पक्षा अंतर्गत कुरबुर, आणि गट बाजी उफाळून आली. शिवसेनेचे माजी जि.प. उपाध्यक्ष व आताचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यात जिल्हा परिषद सभापती पदावरून वाद झाला आणि संजय कदम यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. कदम यांनी 2014 साली राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून दळवी यांचा पराभव केला आणि दापोली मतदार संघ राष्ट्रवादीने काबीज केला. दापोली मतदारसंघ हातचा जाऊ नये म्हणून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोली मतदारसंघाची जबाबदारी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याकडे सोपविली. मात्र, दळवी यांना रामदास कदम यांचा दापोलीतील हस्तक्षेप रुचला नाही तर दापोली मतदारसंघात रामदास कदम आणि योगेश कदम नको म्हणून त्यांनी अनेक वेळा मातोश्रीवर तक्रारींचा पाढा वाचला. मात्र, मतोश्रीने या बाबत दळवी याना फारसे महत्व दिले नाही. अखेर दापोली मतदारसंघातून शिवसेनेतून आपणास उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री झाल्या नंतर दळवी यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जादुटोण्याने आरोप केले आणि याचे थेट पडसाद मातोश्रीवर उमटले. या बाबत रामदास कदम यांनी दापोली येथे दळवी यांचे जादुटोण्याच्या समाचार घेत पक्षातून हा विषय कायमचा संपविण्याचा संकेत दिले होते. त्या नंतर दळवी यांनी काहीच गाजावाजा न करता रत्नगिरी येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या पक्ष भेटीतून भाजप पक्ष प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
