नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून आज (ता.१८) रोजी ई-सिगारेटच्या उत्पादनाबरोबर विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भारतातील ई-सिगारेट विक्री करणाऱ्या मालकांनी नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याकडे असलेल्या साठ्या संदर्भात माहिती घोषित केली पाहिजे. तसेच तो साठा जमा करणे आवश्यक आहे. अवैधरित्या ई-सिगारेट बाळगणाऱ्यांवर पोलिस उपनिरीक्षकाना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ई-सिगारेट साठवण्याऱ्यांना ६ महिन्यांचा तुरूंगवास किंवा ५० हजारापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ई-सिगारेटपेक्षा सिगारेट अधिक घातक असून, त्यावर बंदी का घातली जात नाही असा प्रश्न प्रकाश जावडेकर यांना विचारण्यात आला. त्यावर ई-सिगारेटची अद्याप सवय लागली नाही. म्हणुन यावर सरकारने आधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसेच ई-हुक्क्यावरही सरकारने बंदी घातली असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. या ई सिगारेटवर पहिल्यांदा गुन्हा झाल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. मात्र, दुसऱ्यांदा गुन्ह्या करून आरोपीला पकडण्यात आले तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. ई-सिगारेट हा प्रकार घातकच असल्याचे सांगत कॅनडा, इंग्लंड यांनी त्याच्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेही २००९ मध्ये यावर इशारा दिला आहे. ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर होत नाही. त्यातून राख पडत नाही तसेच दातांवर डागही पडत नाहीत. यामध्ये निकोटीन असले तरी ते शुद्ध स्वरुपात असते. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असून ती ओढताना खरी सिगारेट ओढल्यासारखे वाटते. या सिगारेटमध्ये एक किंवा दोन बॅटऱ्यांचा समावेश असतो. या सिगारेटचा खऱ्या सिगारेटसारखा धूर येत असल्याने याचे व्यसन जडलेल्यांना पर्याय म्हणून ई-सिगारेटचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो.
