खेड : चिपळूण तालुक्यातील परशुराम देवस्थानच्या पेढे येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम यांनी दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. चिपळूण शहरानजीक पेढे परशुराम गावामध्ये परशुराम तलाव असून या तलावांमध्ये कमळाची फुले फार मोठ्या प्रमाणावर येत असत. या तलावाचे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत शुद्धीकरण व सुशोभिकरण करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे देवस्थान कमिटीने केली होती. कमिटीचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, डॉ. प्रशांत पटवर्धन, अँड. जीवन रेळेकर, अभय सहस्त्रबुद्धे, अशोक तांबे, मधुकर वारे यांनी नुकतीच ना.रामदास कदम यांची भेट घेतली होती व त्यावेळी या सुशोभीकरणाच्या कामाची मागणी केली होती. रामदास कदम यांनी सदर कामाला तातडीने मंजुरी देत निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते व सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉ. प्रशांत पटवर्धन व राजू जोशी यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर केला.सदर प्रस्तावाबाबत सादरीकरण पर्यावरण सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासमोर झाले. यावेळी विश्वस्त राजू जोशी उपस्थित होते. या कामासाठी अनिल डिग्गीकर यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
