ध्वजदिन निधी संकलनास हातभार लावून सैनिकांविषय़ीचा आदर व्यक्त करावा : जिल्हाधिकारी

0

रत्नागिरी : देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूर वीरांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन ७ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने निधी संकलनास हातभार लावून सर्वांनी सैनिकांविषयीचा आपला आदर व्यक्त करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे संकलन सोमवारी सुरू झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, युद्धभूमीवर, अतिरेक्यांच्या भ्याड कारवायांमध्ये, मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या बलिदानाची आपण कोणत्याही स्वरूपात परतफेड करू शकत नाही. ध्वजदिन निधीचा उपयोग शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी केला जातो. यावर्षी करोना महामारीमुळे निधी कमी प्रमाणात संकलित झाला आहे. पण आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असताना चालू वर्षाचे निधी संकलनाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी मदत करून पूर्ण करावे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले की, देशाच्या उन्नतीमध्ये सैन्याचा मोठा वाटा आहे. या सैनिकांना मानसिक पाठबळ देणाऱ्या कुटुंबीयांचेही यामध्ये मोलाचे योगदान आहे. सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपण नेहमी मदत केली पाहिजे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दत्ता भडकवाड यांनी प्रास्ताविकात निधिसंकलनाबाबत माहिती दिली. दरवर्षी ७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ध्वजदिन निधी संकलित केला जातो. युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो, असे त्यांनी सांगितले.
कोव्हिडच्या प्रतिबंधामुळे मोजक्या उपस्थितांमध्ये झालेल्या कार्यक्रमात युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा तसेच विशेष गौरव पुरस्कारांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविल्याबद्दल सैनिक पाल्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांना ध्वज प्रदान करून ध्वजदिन निधीचा प्रारंभ करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 08-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here