रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ही १६ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर १ ऑक्टोबर २०१९ पासून भरता येणार आहेत. परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत प्रथम भाषा व गणित तर दुपारी १.३० ते ३या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर होणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप याबाबत सर्व सविस्तर माहिती ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. इयत्ता पाचवीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना, तर आठवीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १ ऑक्टोबरते१५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये https://puppss.mscescholarshipexam.in या वेबसाइटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. विलंब शुल्कासह १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शुल्क भरून अर्ज भरता येणार आहे, यासोबतच अतिविलंब शुल्कासह १ ते १५ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. यंदा परिषदेने अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज भरता येणार आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे १ जून २०१९ रोजी पाचवीसाठी ११ वर्षे व आठवीसाठी १४ वर्षे तर दिव्यांगांसाठी अनक्रमे १५ वर्षे व १८ वर्षे यापेक्षा जास्त वय असू नये. प्रवेश शुल्क दोन्ही परीक्षांकरिता बिगर मागाससाठी २० व दिव्यांग वा मागाससाठी २० रूपये असणार आहे. परीक्षा शुल्क बिगर मागाससाठी ६०, तर मागास वा दिव्यांगांसाठी कोणतेही शल्क असणार नाही. बिलंब शुल्क ५० रुपये, तर १ डिसेंबर ते १५ डिसेंबरसाठी अतिविलंबशुल्क प्रवेश, परीक्षा, विलंब शुल्क व प्रतिविद्यार्थी प्रतिदिन १० रूपये याप्रमाणे, अति विशेष विलंब शुल्क प्रतिदिन २० रूपये आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार नाहीत.
