रत्नागिरी : वीजबिल वसुलीकडे दुर्लक्ष करणे कंपनीला परवडणारे नसून, कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के वसूली करावीच लागेल. त्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. वसुलीत व ग्राहकसेवेत कसूर केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम-पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम-पाटील यांनी सोमवारी सिंधुदूर्गची व मंगळवारी रत्नागिरी मंडलाची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य अभियंता रंजना पगारे, सिंधुदूर्गचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, रत्नागिरीचे प्रभाकर पेटकर यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते व उपविभागीय अभियंते उपस्थित होते. जिल्हानिहाय आढावा बैठकीत बोलताना काळम-पाटील म्हणाले, वसूली ही आपली ‘लाईफ लाईन’ आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले तर कंपनी चालणार कशी? या महिन्यात शंभर टक्के वसुली झाली नाही तर पुढच्या महिन्यात कठोर कारवाई करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला. त्यासाठी नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेळेत केली पाहिजे. केवळ लाईनमनवर भार सोपवून चालणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही जबाबदारी स्वीकारुन वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठबळ दिले पाहिजे. ज्या वर्गातुन कमाल महसूल मिळतो अशा वीजजोडण्या प्रलंबित ठेवल्याने आर्थिक नुकसान होत आहे. आपले महावितरण खाते सामान्य माणसांशी निगडित आहे. कामासाठी जनतेची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याबद्दल बजावताना चुकीचीमाहिती देणाऱ्यांचा समाचार घेतला.
