नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. पक्षांतराचे पीक जोरात आले आहे. प्रत्येक पक्षाकडून विधनासभेचा गड जिंकण्यासाठी कंबर कसली जात आहे. प्रचारासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. आता लोकसभा निवडणुकीतील पराभव लक्षात घेऊन राष्ट्रवादी व काँग्रेस पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांची एकत्रित प्रचारसभा होणार आहे. यासोबतच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी देखील महाराष्ट्रात रॅली काढणार आहेत. प्रियांका गांधी आणि शरद पवार पहिल्यांदाच एका रॅलीमध्ये व एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५-१२५ आणि मित्रपक्ष ३८ असा आघाडीचे जागावाटप ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्या प्रचार सभा घ्याव्यात, अशी विनंती महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आली होती. यानंतर आता विधानसभेसाठी या सर्वांच्या प्रचार सभा होणार आहेत.
