नवी दिल्ली : दिल्लीच्या दौर्यावर असणार्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनमधून (एनआरसी) वगळण्यात आलेल्या १९ लाख लोकांच्या भवितव्याचा प्रश्न शहा यांच्यापुढे मांडला. शहा यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर बॅनर्जी यांनी त्यांची प्रथमच भेट घेतली. तत्पुर्वी, बुधवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. जगातील दुसर्या सर्वाधिक मोठ्या कोळसा खाणीचे उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना प. बंगालमध्ये येण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले आहे. एनआरसीमध्ये सुमारे १९ लाख लोकांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंदी, बंगालीभाषिक आणि स्थानिक आसामी लोकांचा समावेश आहे. त्या सर्व लोकांचा समावेश एनआरसीमध्ये करण्यात यावा, याविषयी शहा यांच्याशी चर्चा केल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसे पत्र अमित शहा यांना सादर करण्यात आले आहे. प. बंगालमध्ये एनआरसीची गरज नसल्याची आपली भूमिका कायम आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्या.
