मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसराला बुधवारी मध्यरात्री एकामागून एक जोरदार भूकंपाचे धक्के बसले. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार 4.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाड पर्यंत या भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने या परिसरातील नागरिक भीतीने पाऊस सुरू असतानाही घराबाहेर पडले. तर काहींनी रात्र घराबाहेर रस्त्यावर जागून काढली. दरम्यान, काही वेळाच्या अंतराने सात धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री 9.49 वाजता 2.4 रिश्टर स्केल, 12.33 वाजता 2.2 रिश्टर स्केल, 12.36 वाजता 1.9 रिश्टर स्केल, 1.03 वाजता 4.8 रिश्टर स्केल, 1.12 वाजता 2.9 रिश्टर स्केल, 1.15 वाजता 3.6 रिस्टर स्केल, 1.18 वाजता 2.8 रिस्टर स्केल असे एकूण एक तासात सात भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. यामध्ये 1.03 वाजण्याच्या सुमारास सर्वाधिक 4.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली आहे.
