शिवसेनेशी युती झाली नाही तरच दळवी यांना भाजपत संधी !

0

दाभोळ : दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान रत्नागिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . आपल्यावर शिवसेनेत अन्याय होत असून ते मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे .

शिवसेनेशी युती झाली नाही तर दळवी यांचा पक्षप्रवेश होणार असून तोपर्यत त्यांना थांबण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे असे समजते . अन्याय शिवसेनेत झाला तर न्याय मागण्यासाठी भाजपाच्या दारात जाण्याच्या दळवींच्या भूमिकेमुळे ही दळवींची नवीन खेळी तर नाहीना अशी चर्चा सध्या दापोलीत सुरू आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत दळवी यांचा राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी पराभव केल्यावर दळवी काही काळ राजकीय विजनवासात गेले होते.

काही दिवस दापोलीतील शिवसेनेला कोणी वाली नव्हते त्यामुळे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्यांचा मुलगा योगेशला दापोली विधानसभा मतदारसंघात सक्रिय केले.

जसजसे योगेश कदम यांचे दापोली प्रस्थ वाढू लागले तशी आपल्या भवितव्याची काळजी सूर्यकांत दळवी यांना लागू लागल्याने त्यांनी रामदास कदम यांना विरोध करणे सुरू केले मात्र तोपर्यंत कदम पितापुत्राने विविध विकासकामे करून दापोली विधानसभा मतदारसंघावर आपली मजबुत पक्‍कड निर्माण केलीआहे .

दळवी यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून कदम गटाकडे गेले. त्यानंतर दळवी यांनी विविध पर्याय शोधण्यास सुरुवात केली. सुमारे 2 ते 3 वर्षापूर्वीच दळवी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्याला मंत्रीपद किंवा महामंडळ दिल्यास आपण भाजपात प्रवेश करतो असे सांगितले होते मात्र दळवींची उपयुक्‍तता काय आहे हे ध्यानात घेऊन चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी त्यांना कायम गोड बोलून झुलवत ठेवले होते.त्यानंतर अनेक वेळा दळवी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

शिवसेनेचे पक्षप्रमुख यांची भेट घेऊन दळवी यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय दूर करावा अशी मागणी केली होती. पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने हताश झालेल्या दळवी यांनी वेगळा विचार करण्याचे अनेकवेळा इशारे दिले. मात्र पक्षाकडून त्याला फारशी किंमत देण्यात आली नाही.

अखेर रत्नागिरी येथे महाजनादेश यात्रेला आलेल्या मुख्यमंत्र्यांची दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेतली तेव्हाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांनी युतीबाबत निर्णय होईपर्यंत थांबा असेच सांगून त्यांची बोळवण केली आहे ,त्यामुळे तूर्तास तरी दळवी यांचा प्रक्षप्रवेश लांबला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here