राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी यांनी नुकतीच मुंबई येथे राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यां भेट घेऊन रत्नागिरी जिल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 76 बीएमएस डॉक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भेटीदरम्यान आमदार राजन साळवी यांनी राजापूर, लांजा व साखरपा येथील आरोग्य यंत्रणेबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली. त्यामध्ये प्रामुख्याने लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची बिकट अवस्था आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांचेकडे कथन करत ही इमारत नवीन बांधण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार राजन साळवींच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत मा.
आरोग्यमंत्री महोदयांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठी 15 कोटी 80लाखाच्या निधीला तत्वतः मान्यता दिली.
लांजा ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत ही 3 मजली होणार असून 10000 चौ.फू. एवढ्या प्रशस्त जागेमध्ये 50 बेड सह अद्ययावत यंत्रणा या इमारतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेतल्याने आमदार राजन साळवींच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर या इमारतीच्या बांधकामाची निविदा देखील प्रसिद्ध होणार आहे. लांजा ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत मंजूर झाल्याने इमारतीच्या बांधकामानंतर लांजा तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
