वेणेगाव : भारतीय जनता पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्यासारख्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. पक्षासाठी ज्यांनी अविरत कष्ट घेतले त्यांनाच पक्षाने संधी दिली पाहिजे. मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजप वाढवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन पालचे माजी सरपंच सुरेश पाटील यांनी केले. विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष ना. अतुल भोसले, कराड उत्तरचे भाजपा नेते मनोज घोरपडे व मान्यवरांच्या उपस्थितीत शिरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप निष्ठावंतांनी आयारामांवर तोफ डागली.
सुरेश पाटील म्हणाले, गेली 5 वर्षे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम मनोजदादांच्या नेतृत्वाखाली करत असून संपूर्ण कराड उत्तरमध्ये ना. शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, मनोजदादांच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढलेली आहे. परंतु, काही मंडळी ज्यांचा पक्षाशी कसलाही संबंध नाही आणि ज्यांनी अजून पक्षात प्रवेश केला नाही. गेली 5 वर्षे लोकसंपर्कात नसलेले आणि निवडणुका आल्या की मीच कराड उत्तरचा उमेदवार असल्याचा आव आणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रथम आपल्याला लोकांनी आतापर्यंत का नाकारले आहे ते बघावे. आपल्या कारखान्याला शेतकर्यांनी दिलेल्या उसाचे पैसे द्या, कामगारांचे पगार द्या, पक्षात प्रवेश करा अन् मग बोला. केवळ लोकांचा बुध्दीभेद करू नका, असे आवाहनही पाटील यांनी केले. संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. तेव्हा सावध रहा, आम्हाला मर्यादा सोडायला लावू नका. अन्यथा तुमचा पूर्णपणे पोलखोल करू. भाजपा हा विचारावर चालणारा पक्ष आहे. इथे त्यासाठी पक्षाचे प्रामाणिक काम करावे लागते. पक्षाकडून मनोजदादांचे नाव निश्चित होत असताना त्यामध्ये कुणी खोडा घालत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी ना. अतुल भोसले, मनोज घोरपडे, दादासाहेब यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विद्या महाडीक, संतोष पाटील, दिपकराव यादव, मानसिंग यादव, तानाजी महाडीक, सौ. पद्माताई जाधव, गुलराज मुजावर, कल्पना गायकवाड, रमेश यादव, अरविंद महाडीक, अजिज मुजावर, आप्पासो गायकवाड, विशाल शेजवळ आदि उपस्थित होते. प्रास्तविक संतोष यादव यांनी केले तर अरविंद महाडीक यांनी आभार मानले.
