सावंतवाडी : सावंतवाडी शहर पर्यटननगरी व्हावे, शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त व्हावे आणि परदेशी पर्यटक शहरात यावेत यासाठी शहराला गेल्या दहा दिवसांमध्ये सुमारे 40 कोटी रुपयांचा निधी विविध विभागामार्फत देण्यात आला आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांचे स्मारक आपल्या स्वप्नातला प्रकल्प असून शहराला नवी झळाळी प्राप्त करून महिला बचतगटांना सक्षम करण्यात येईल, असे प्रतिपादन शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ना. केसरकर यांच्या हस्ते शहरातील 2 कोटी रुपयांच्या मोनोरेल प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच रघुनाथ मार्केट कला दालनाचा शुभारंभ झाला. जि.प. सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, हिंगोली पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, आबा केसरकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, महिला व बालकल्याण सभापती भारती मोरे, तालुका महिला संघटक कोठावळे, रश्मी माळवदे, उपसभापती दीपाली सावंत, जिल्हा संघटक अॅड. नीता सावंत – कविटकर, शुभांगी सुकी, पाणीपुरवठा सभापती सुरेंद्र बांदेकर, आरोग्य व क्रीडा सभापती खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, कृतिका दळवी, चंद्रकांत कासार, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते. सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथ भोसले उद्यानांमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मोनोरेल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रघुनाथ मार्केटचाही शुभारंभ केला. ते म्हणाले, कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांचे कलादालन सावंतवाडीमध्ये होत आहे. यामध्ये पैठणी, कोल्हापुरी चप्पल तसेच महिला बचतगटांच्या वस्तू मांडण्यात येणार आहेत. परदेशी पर्यटक शहरात येतील. येथील पर्यटन वाढेल यासाठी सावंतवाडी संस्थानचा राजवाडा, शिल्पग्राम बाजार, रघुनाथ मार्केटला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देत असताना कायम चालू रहावे यासाठी एमएसएसआयडीसी खादी ग्रामोद्योग व माविमच्या माध्यमातून वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या धर्तीवर रघुनाथ मार्केट सिंधुदुर्गात होत आहे याचा आपणास अभिमान आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्गचे वैशिष्ट्य दिसले पाहिजे. महिलांना नवीन दालन उपलब्ध व्हावे, त्यांनी विक्री केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे दालन होत आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन वर्षापासून रखडले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सावंतवाडी शहरांमध्ये तारांगण होत असून त्यासाठी दोन कोटी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे. पाच कोटी चे योगा सेंटर आरक्षित जागेत होणार आहे. शहरांमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी 37 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यांचे नूतनीकरण केले जात असून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्न केला आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी 48 कोटी पाणी योजनेसाठी देण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांना 24 तास पाणी मिळणार आहे. याशिवाय बेस्ट नागपुरी सभागृहासाठी 1 कोटी 60 लाख रुपयेे नूतनीकरणासाठी निधी देण्यात आला आहे. सावंतवाडी पर्यटन नगरी व्हावी यासाठी बोटिंग सुविधा करिता एक कोटी रुपये, अंडरग्राउंड वीज वाहिन्यांसाठी अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोडामार्ग, सावंतवाडी आणि बांदा येथे सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शहरे प्रगतपिथावर यावीत, असा आपला प्रयत्न आहे. आपल्या स्वप्नातला प्रकल्प म्हणून शिवराम राजेभोसले स्मारकासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या स्मारकामध्ये हस्तकला, गंजिफा वसतिगृह असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास महाराष्ट्र लघुउद्योग विकास मंडळाचे राजेश कांदळगावकर, महाकॉयरचे प्रभारी अधिकारी शेखर सावंत, बांबू उद्योग जिल्हा समन्वयक जितेंद्र वजराटकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नितीन काळे, जिल्हा समन्वयक अधिकारी आशालता जयाने आदी वर्ग उपस्थित होते.
