मुंबई ः लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे स्थानकावरून टॅक्सीसोबतच प्रीपेड रिक्षासेवा सुरू करण्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत गुरूवारी मंजुरी देण्यात आली आहे. घाटकोपर येथील रिक्षाचालक सेवा संघटनेने एका वर्षासाठी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी देत प्राधिकरणाने प्रीपेड रिक्षास परवानगी दिली आहे. मुंबई पूर्व उपनगराचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, एलटीटी रेल्वे स्थानक निर्देशक, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांची बैठकी गुरूवारी पार पडली. या बैठकीत मुंबई टॅक्सीमेन्स युनियन व महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत प्रीपेड रिक्षासेवेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच घाटकोपर रिक्षाचालक सेनेस ही सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यावर एकमत झाले. या बैठकीत झालेल्या निर्णयात एलटीटी रेल्वे स्थानक परिसरात प्रीपेड रिक्षा सेवेसाठी रेल्वे प्रशासन मोकळी जागा उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भात आरटीओ आणि रेल्वे प्रशासनामध्ये एक वर्षासाठी करार केला जाईल. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या भाडेदरांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी वाहतूक नियमांना अधीन राहून रिक्षाचे भाडे आखून दिले जाणार आहे. आरटीओ परवानगीनेच प्रीपेड रिक्षासेवा सुरू होणार असल्याने टॅक्सीचालकांच्या मुजोरीला लगाम लागण्याची शक्यता आहे. याआधी एलटीटी रेल्वे स्थानकावरून टॅक्सी सेवा पुरवण्यात येत आहे. मात्र टॅक्सीसेवेविरोधात प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्याने प्रीपेड रिक्षाचा मार्ग काढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
