फूणगुस : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस-थुळवाडी येथे जमीन दुभंगत असून घरांनाही तडे गेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध होताच, तहसीलदार संदीप कदम हे भूगर्भ तज्ज्ञांसह घटनास्थळी बुधवारी तातडीने दाखल झाले. चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे धरण फुटल्यानंतर महसूल यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. फुणगूस-थुळवाडी येथे संपूर्ण परिसरात जमिनीला भेगा गेल्याचे समोर आले असून या भेगा रुंदावत जाऊन जमीन एका बाजूने खचत आहे. येथील 22 घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मात्र, प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नव्हती. याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच यंत्रणा हलली आणि प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. बुधवारी सायंकाळी तहसीलदार संदीप कदम हे भूगर्भ तज्ज्ञ रश्मी कदम यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पाहणीअंती याभागातील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले. येथील शंकर कुलकर्णी यांच्या घराच्या समोरच जमिनीला तडे गेले आहेत.परंतु त्यांचे घर बंद असल्याने घरामध्येही तडे गेल्याचे उघड झाले नव्हते. मात्र बुधवारीच त्यांचे घर उघडण्यात आले तेव्हा त्यांच्या घराला आणि भिंतीला तडे गेल्याचे निदर्शनास आले. घर मधोमध दुभंगत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.थुळवाडीच्या संपूर्ण परिसरालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. जमिनीला पडलेल्या भेगा रुंदावत जाऊन जर डोंगराचा भाग खचू लागला आहे. त्यामुळे जवळच असलेल्या गुरववाडीला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांनी येथे भेट दिली. त्यावेळी तलाठी तांदळे आणि सरपंच सांची भोसले उपस्थित होते.पूर्ण परिसराची पाहणी करून तहसीलदार कदम यांनी येथील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पावसाचा जोर वाढल्यास येथे वास्तव्य करू नका, सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतर करा, असेही सांगितले. भूगर्भतज्ज्ञ रश्मी कदम यांनीही परिसराची पूर्ण पाहणी केली. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गेले आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.या भेगा अधिक मोठ्या होण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी सांगितले.तसेच शंकर कुलकर्णी यांच्या घराची देखील त्यांनी पाहणी केली. कुलकर्णी यांनी तात्काळ येथून स्थलांतर करावे, या घरात राहू नये, अशीसूचना केली.अन्य ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे तसेच तलाठ्यांनी दररोज येथील पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचनादेखील त्यांनी यावेळी केल्या.
