मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना 126 जागा लढण्यावर राजी झाली असून भाजप आणि मित्र पक्षांना 162 जागा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात गुरुवारी रात्री चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हा फॉर्म्युला मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा हे रविवारी मुंबईत येत असून त्यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा केली जाऊ शकते. शिवसेनेने 144-144 जागांचा आग्रह धरला होता. मात्र, भाजपने हा फॉर्म्युला अमान्य करीत शिवसेनेला 110 ते 115 जागा देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, गुरुवारी भाजपने 126 जागांचा प्रस्ताव पाठवला. त्यावर उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यात चर्चा झाली. या प्रस्तावाला उद्धव यांनी होकार दर्शवताच सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा केली. यापूर्वी 144-144 जागा घेऊन त्यातून दोघांच्या कोट्यातून मित्रपक्षांना समसमान जागा सोडाव्यात असा शिवसेनेचा आग्रह होता. मात्र, भाजपने त्यास नकार दिला होता. आता भाजप आपल्या 162 जागांमधून मित्रपक्षांना जागा सोडणार आहे.
