रवी राणांच्या पोषाखावर विधानसभा अध्यक्षांचा आक्षेप; सभागृहाबाहेर जाण्याचे दिले आदेश

0

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आमदार रवी राणा यांनी परिधान केलेल्या पोषाखावरुनही सभागृहात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. “शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार”, अशा आशयाचा बॅनर असलेला पोषाख रवी राणा यांनी परिधान केला होता. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी रवी राणा यांच्या या पोषाखावर आक्षेप घेतला व त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतरही रवी राणा यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली. यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले आणि राणा यांना निलंबित करण्याची मागणी केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. “रवी राणा यांची कृती योग्य नसली तरी त्यांनी मांडलेला मुद्द्याचा आपण विचार करायला हवा”, असं सांगत फडणवीस यांनी रवी राणा यांना सभागृहाबाहेर जाऊन तो पोषाख उतरविण्याची विनंती केली. तरीही गोंधळ थांबताना दिसत नसल्यानं नाना पटोले यांनी उभं राहून सभागृहातील सदस्यांना कडक सूचना दिल्या. “रवी राणा यांची कृती योग्य नसून अशापद्धतीचे पोषाख परिधान करुन कुणी सभागृहात येण्याचा प्रयत्न करत असेल तर यापुढे त्यांना गेटवर थांबविण्यात यावं”, असे आदेश नाना पटोले यांनी गेट मार्शल यांना दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here