नवी दिल्ली : शाहजहांपूर येथील विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोप केलेले भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीच्या टीमने स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना न्यायालयात हजर केले जाईल. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून एसआयटीचे पथक देखील रुग्णालयात आहे. पीडीत मुलीने याआधी २४ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यात तिने चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याने अनेक मुलींचे आयुष्य उद्ववस्त केले आहे. त्याचबरोबर आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा धोका आहे, असे तिने म्हटले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चिन्मयानंद यांच्या विरोधात अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. पीडित तरुणीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, जर चिन्मयानंद यांना अटक नाही झाली तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. पीडित तरुणीने एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करत चिन्मयानंद यांच्याविरोधात कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला होता. तरुणीच्या या वक्तव्यानंतर एसआयटीने बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी, ‘एसआयटी कोणाच्या भावनांनुसार किंवा कोणाच्या अपेक्षेनुसार तपास करणार नाही. तथ्ये आणि विधानांच्या आधारे एसआयटी चौकशी करत आहे. तसंच सर्व बाजूंनी संयम साधण्याची गरज आहे’, असे एसआयटीचे आयजी नविन अरोरा म्हणाले होते. २३ तारखेला या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती त्यावेळी एसआयटीकडून देण्यात आली होती. यानंतर आता याप्रकरणी एसआयटीच्या टीमने स्वामी चिन्मयानंद यांना आश्रमातून अटक करण्यात आली आहे.
