सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कायद्यासंदर्भात चर्चासत्र आयोजित करणार : नारायण राणे

0

रत्नागिरी : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या तीन कृषिविषयक कायद्यांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे चर्चासत्र लवकरच आयोजित केले जाईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने कृषीविषयक सुधारणा घडविणारे तीन कायदे आणले आहेत. त्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या कायद्यांचा हेतू या देशातील शेतकरी समृद्ध व्हावा हाच आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा पंतप्रधनांचा मुख्य उद्देश आहे, असे ते म्हणाले

शेतकरी स्वतःच्या शेतात तयार केलेला आपला माल कोठेही मुक्तपणे विकतील, बाजार भाव ठरवतील. जेथे जास्त फायदा मिळेल, तेथे शेतकरी आपला माल विकेल. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे भाव मिळेल. त्यामुळे त्यांचा अधिक आर्थिक फायदा होईल. दलाल पद्धत रद्द होईल आणि अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. त्यासाठीच “एक देश एक बाजार” हा मंत्र घेऊन मोदींनी ही योजना सुरू केली आहे. विरोधक मात्र या कायद्यांच्या बाबतीत अफवा आणि गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास शून्य आहे. गेली ७० वर्षे राज्य करणाऱ्यांनी असे कायदे का आणले नाहीत? ते त्यात अपयशी ठरले आहेत.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सरकारने बोलावले आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकी कशावर चर्चा होणार, हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांना अधिवेशन नको, कॅबिनेट मीटिंग नको. कारण ते महाराष्ट्राची परिस्थिती हाताळू शकत नाहीत, निर्णय घेऊ शकत नाही. शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना जिल्ह्याबद्दल आस्थाच नाही ते जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अपयशी ठरले आहेत, असेही श्री. राणे म्हणाले. करोनाच्या बाबतीतही राज्य सरकार अपयशी ठरल्याचे सांगून ते म्हणाले की, करोनाचे ४८ हजार मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले. हे या सरकारचे दुर्दैव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ मी आणला आहे. तो अधिकृतपणे लवकरच आम्ही सुरू करणार आहोत, असेही ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 15-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here