मार्गताम्हाणे जवळ मारूती व्हॅनची एसटीला धडक

0

चिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावरील मार्गताम्हाणे जवळील बोऱ्या फाट्याजवळ बस आणि मारूती व्हॅन यांच्यात अपघात होऊन दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, उशिरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत. हा अपघात गुरुवारी (दि. १९) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. गुहागरवरून चिपळूणच्या दिशेने जाणारी एसटी बस बोऱ्या फाटा येथे थांबून प्रवासी चढ-उतार करीत होते. यावेळी गुहागरवरून चिपळूणकडे जाणाऱ्या मारूती व्हॅनने बसला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये मारूती व्हॅनमधील दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीने चिपळूण येथील लाईफ केअरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु पुढील उपचारासाठी अन्यत्र त्यांना हलविण्यात आले आहे. एसटीचे अधिकारी आणि चिपळूणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मारूती व्हॅन चिपळूण येथील परिसरातील असल्याचे समजते. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here