मंडणगड : मंडणगड पंचायत समितीची नुकतीच झालेली मासिक सभा गणसंख्या पूर्ण असतानाही सभापती आदेश केणे यांनी तहकूब केली. विरोधी पं. स. सदस्याला सभापतींच्या रांगेत बसायला खुर्ची दिल्याने या निर्णयाला पं.स.सदस्य नितीन म्हामुणकर यांनी विरोध केला. त्यामुळे हे खुर्चीनाट्य उत्तरोत्तर रंगले. या सभेची चर्चा आता तालुक्यात होऊ लागली आहे. ही सभा नियमितपणे सुरू झाली. मात्र यावेळी सभापती आदेश केणे यांनी विरोधी पं. स. सदस्या प्रणाली चिले यांना सभापती, उपसभापती व सचिव यांच्याबरोबर बसण्यासाठी मंचावर खूर्ची मागवली. त्या ठिकाणी त्यांना बसविले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगळोली गणाचे पं. स. सदस्य नितीन म्हामुणकर यांनी आक्षेप घेतला. सभापतींनी सभेचा शिष्टाचार मोडू नये, असे सूचविले. पं. स. सदस्यांना मंचावर बसवण्यासंदर्भात सभापतींना खुलासा करण्याची मागणी केली. यावर सभापती केणे यांनी केवळ समजून घ्या, असे सांगितले. त्यानंतर सभागृहाने या बाबीची दखल न घेतल्याने म्हामूणकर यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत सभागृहाच्या जमिनीवरच बैठक मांडत आपला विरोध दर्शवला. सभेसाठी आवश्यक असणारा कोरम पूर्ण असल्याने प्रोसीडिंग तथा उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षार्याही घेण्यात आल्या होत्या. असे असताना सभापतींनी या घटनेनंतर लगेचच सभा तहकूब केली. कोरम पूर्ण असताना सभा तहकूब करण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याने सभापतींच्या या निर्णयाची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे. सभेसाठी आवश्यक गणसंख्या, सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित असताना तालुक्यातील विकासासंदर्भात चर्चा व निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र या सभेत सभापतींच्या मनमानी धोरणांचा प्रत्यय आला. सभापतींनी सभा तहकूब केली ही बाब सभाशिष्टाचाराला धरून नसून चिंताजनक आहे. सध्याचे सभापती राजकीय हितसंबंध जपण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका पं.स.सदस्य नितीन म्हामुणकर यांनी केली आहे.
