नवी दिल्ली : सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून आज आणखी एक बूस्टर डोस देण्यात आला. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केला. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करांमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे अशा कंपन्यांना आता २२ टक्के कर द्यावा लागेल. तर अधिभार आणि सेस मिळून २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. यामुळे कॉर्पोरेट सेक्टरला मोठा दिलासा मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षापासूनच कराचे नवे दर हे लागू होणार आहेत. कंपनी करात कपात केल्यानंतर वार्षिक महसूल १.४५ लाख कोटी राहणार असल्याचे सीतारामण म्हणाल्या. देशी आणि स्थानिक उत्पादक कंपन्यांवरील कराचा बोजा कमी करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या घोषणेनंतर आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स वधारला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल १६२९ अंकांनी वर गेला. तर निफ्टीनेही ४३२ अंकांनी वाढून उसळी घेतली.
