रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पार पडल्यानंतर आता अनेक गोष्टींच्या चर्चा झडत आहेत. महाजनादेश यात्रेची सभा ज्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर झाली. त्याठिकाणी मोठमोठे ट्रक जाऊनचाकामुळे चरवखड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे खो-खोसह फुटबॉल व क्रिकेटच्या मैदानाचे नुकसान झाले आहे. या मैदानाच्या दुरुस्तीबाबत रत्नागिरी पालिका कोणती भूमिका घेते? मैदानाची दुरुस्ती करण्यासाठी जनतेच्या खिशातूनच पैसे खर्च करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचा मंडप उभारण्याचे काम सुमारे चार दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले होते. प्रती महिना ४० ते ४५ हजार रु.खर्च करुन पालिकेमार्फत मैदानाची डागडूजी केली जाते. परंतु मंडप उभारण्यासाठी आलेल्या अवजड वाहनांनी मैदानात मोठ-मोठे चर पाडले आहेत. तर खोखो मैदानाची पूर्णतः दुरावस्था झाली आहे. या मैदानावर खो-खोच्या दोन्ही टीम सराव करतात. परंतु तेथे आता चिखलाचे साम्रज्य निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी खो-खोचा सराव कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सभा झाल्यानंतरही सामान नेण्यासाठी येणाऱ्या ट्रकमुळे खड्डे व चार आणखी मोठे झाले. सभेच्यावेळीही आलेल्या कार्यकर्त्यांना या चरामधून चालावे लागत होते. सभा संपून मंडप काढण्यात आला आहे. आता मैदानात पडलेले खड्डे व चर बुजवणार कोण हा प्रश्न खेळाडूंपुढे पडला आहे. चर व खड्डे बुजवण्यासाठी नगर पालिकेला मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे मैदान पूर्ववत कधी होणार याकडे खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे.
