रत्नागिरी : दि. २९ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात रत्नदुर्ग निवासिनी श्री देवी भगवतीच्या दर्शनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनाला येतात. मात्र, किल्यावर जाणाऱ्या रस्त्यांची आणि पथदीपांची दुरवस्था झाली असून, घटस्थापनेपूर्वी यांची दुरुस्ती करावी, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे शहर सरचिटणीस रमाकांत आयरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. उत्सव काळात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच मंदिरही २४ तास खुले असल्यामुळे रात्री तसेच पहाटेही अनेक भाविक दर्शनासाठी येतात. यंदाच्या वर्षी पावसाळ्यात येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर खडीही आहे. यावरून घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रस्ते मुळातच अरुंद आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या कालावधीत वाहतूक कोंडी होते. यावरही उपाय करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्त्यांप्रमाणेच येथील पथदिव्यांचीही दुरवस्था झाली आहे. मार्गावरील अनेक पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अंधारातून चाचपडत चालावे लागत आहे. या पथदिव्यांचीही तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या निवदेनाद्वारे करण्यात आली आहे.
