गळती लागलेली 7 धरणे सुरक्षित

0

रत्नागिरी : तिवरे येथील धरण फुटून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक धरणांच्या गळतीचा प्रश्‍न पुढे आला आहे. जिल्ह्यातील गळती लागलेल्या 7 धरणांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठाचे प्रा. डॉ. सचिन पोरे व भूवैज्ञानिकांनी पाहणी केली. या 7 धरणांना कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. या सर्व धरणे भरली असून नागरिकांच्या मनात भीती असल्याने याठिकाणी 24 तास सुरक्षारक्षकांची नियुक्‍ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीनंतर 24 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर जिल्ह्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प, मध्यमप्रकल्प व केटी बंधार्‍यांमधून होणार्‍या गळतीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाल्याचे दिसून आले. अनेक ग्रामस्थांनी या गळतीबाबत भीती व्यक्‍त करीत दुरुस्तीची मागणी केली होती. त्यामुळे शासनाच्या भूवैज्ञानिकांसह आयआयटी रुरकी येथील पीएच.डी. प्राप्‍त रायगड येथील लोणेरे विद्यापीठाचे ज्येष्ठ भूतज्ज्ञ डॉ. सचिन पोरे यांनीही धरणांची व भूस्खलन होणार्‍या भागांना भेटी दिल्या. जिल्ह्यातील निवे बुद्रुक जोशीवाडी येथील धरणाच्या खालील बाजूला भेगा गेल्या आहेत. या भेगांचा कोणताही धोका धरणाला नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. डोंगरात पडलेल्या भेगा या खालील बाजूला नाल्यापर्यंत जाणार्‍या असल्याचेही त्यांनी अहवालात स्पष्ट केले आहे. चिपळूण तालुक्यातील मोरवणे येथील धरणाला लागलेल्या गळतीचीही त्यांनी पाहणी केली. हे धरण सुरक्षित असून, त्याठिकाणी उगवलेली झाडेझुडपे तोडण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. संगमेश्‍वर तालुक्यातील रांगव धरणाबाबतही तक्रारी आल्यानंतर डॉ. पोरे यांनी भेट दिल्या. यावेळी 70 टक्केपर्यंत पाण्याची पातळी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. या धरणाबाबतही त्यांनी सूचना केल्या असल्या तरी या धरणालाही कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजापूर तालुक्यातील तळवडे येथील धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती होत असल्याने ती रोखण्यासाठी केमिकल ग्राऊंटींग करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. चिपळूणअंतर्गत येणारे कोंडवली आणि साखरपा येथील धरणालाही धोका नसल्याचे डॉ. पोरे यांनी स्पष्ट केले असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. ज्या धरणांमधून पाणी गळती होत आहे. त्याठिकाणी 24 तास वॉचमनची नियुक्‍ती केली जाणार असून, लक्ष ठेवले जाणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.  दापोलीतील खेम धरणाच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून होत आहे. शासनाकडून यासाठी दोन कोटी 34 लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार होत आहेत. या भागांनाही डॉ. पोरे यांनी भेट दिली. विशेषत: चिपळूण तालुक्यातील रिक्टोली व गोवळकोट येथील भागाला भेट देऊन अहवाल दिला आहे. जिल्ह्यात तांबडी माती आहे. त्यातून पाणी मुरल्यावर ते खडकापर्यंत जाते. त्यातून माती सैल होऊन खडकापासून वेगळी होते व भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. त्यावर संरक्षक भिंत बांधणे हा अंतिम उपाय होऊ शकत नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मिरजोळे येथे जमीन खचण्याचे प्रकार वारंवार घडत असून त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे अहवाल पाठवण्यात आला असल्याचीही माहिती त्यांनी दिली. गोवळकोट दरडग्रस्तांच्या घरांच्या प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तिवरे येथील आपत्तीग्रस्तांसाठी नवीन घरे बांधून देईपयर्र्त कंटेनर घरांमध्ये त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. ही घरे मुंब्रा येथील महाराष्ट्र कंटेनर कंपनीकडून तयार करुन घेण्यात येत असून, काही कंटेनर घरे लवकरच तिवरेत दाखल होणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. त्याचप्रमाणे धरणांच्या खाली जी घरे आहेत, त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here