फळांच्या प्रक्रिया उत्पादनांवर ५ % दराने GST आकारणी करावी

0

रत्नागिरी : कोकणातील आंबा, कोकम, फणस आणि इतर प्रक्रिया उद्योगाला १ जुलै २०१७ पासून सुरु झालेल्या GST (Good & Service Tax) कर आकारणीबाबत जयंत देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान निवेदन दिले. यामध्ये नवीन GST करप्रणालीमध्ये आंबा, कोकम, फणस इ. फळांच्या प्रक्रिया उत्पादनांवर ५ % दराने GST आकारणी करावी अशी मागणी पावस येथील प्रसिद्ध आंबा व्यावसाविक जयंत देसाई यांनी केली आहे. राजापूर येथून रत्नागिरीकडे जात असता पावस येथे मुख्यमंत्री काही काळ थांबले. त्यांनी देसाई कुटुंबीयांची यावेळी भेट घेतली. देसाई यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटल्याप्रमाणे १ जुलै २०१७ पासून संपूर्ण देशात नवीन GST कर आकारणी लागू झाली आहे. एकाच उत्पादनाला/वस्तूला किंवा सेवेसाठी विविध कर आकारणी जाऊन त्याऐवजी एकच कर आकारणी पध्दत ही निश्चितच उद्योगासाठी चांगली ठरु शकेल. कोकणामध्ये मुख्यतः आंबा, कोकम, काजू, फणस इत्यादी सिझनल फळांवर येथील ९०% पेक्षा जास्त लोकांचे अर्थकारण अवलंबून आहे. अलीकडे काही वषार्पासून आमच्या सारखेच आंबा, कोकम, फणस इ. फळांवर प्रक्रीया करुन त्यापासून विविध नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करणारे छोटे मोठे उद्योग उभे राहू लागले आहेत. त्यामुळे येथील जगप्रसिध्द हापूस आंब्याला सिझन व्यतिरिक्त त्याचे Value Addition होऊन आंबा बागायतदारांच्यापासून प्रक्रिया उद्योगांपर्यंत चांगला फायदा होऊ लागला आहे. मागील महिन्यात रत्नागिरी हापूस व देवगड हापूसला Geographical Indication मिळाल्याने त्याचीही आंब्याच्या व त्यापासूनच्या उत्पादनांच्या Marketing साठी मोठी मदत होऊ शकणार आहे. आंबा, कोकम, फणस ही नाशिवंत फळे आहेत. त्यामुळे या फळांवर आधारीत उद्योग हे शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होऊन कोकणातील अर्थकारण चालायला मोठा हातभार लावतात. सध्या कोकणात ४८ उद्योजक एकत्र येऊन आंबा प्रक्रिया समूह या Ministry of MSME च्या MSE – COP योजने अंतर्गत CFC कार्यरत झाली आहे. या स्कीम चा फायदा होणारे सर्व Micro / Small उद्योजक आहेत. तसेच कोकणात अजून १०० लहान मोठे प्रक्रिया उद्योग आहेत. याआधी युती सरकारच्या काळामध्ये वरील बाबींचा कोकणातील आर्थिक विकासाला, त्यातून होणाऱ्या रोजगारवाढीला चालना देण्यासाठी आंबा, कोकम, फणस अशा कोकणांतील फळांवर प्रक्रिया होणाऱ्या उत्पादनांवर विक्रीकरातून संपूर्ण माफी देण्यात आली आहे. त्यानंतर VAT करप्रणाली आल्यामूळे त्यावर ५ % व नंतर ६ % VAT आकारणी होऊ लागली व आता नवीन GST करप्रणालीमध्ये फळ उत्पादनांवर HSN २००७ प्रमाणे १२ % कर आकारणी करण्यात आली आहे. यामुळे येथील उत्पादनांचा दर्जा उत्तम असून देखिल १२ % कर आकारणीमूळे उत्पादनाच्या किंमती वाढून देशातील व देशाबाहेरील अन्य उत्पादनांचा किंमतीकडून सामना करणे अवघड झाले आहे व बाजारपेठेत टिकून राहण्यास आणखीनच कठीण होऊन प्रक्रिया उद्योग अडचणीत आले आहेत. कोकणातील काजु प्रक्रिया उद्योगाला १२ % लागणारा GST कमी करुन ५ % आकारणीला मंजुरी मिळाली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु कोकणात आजघडीला काजुप्रक्रीया उद्योगाप्रमाणेच आंबाप्रक्रिया उद्योग हाच मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नवीन GST करप्रणालीमध्ये आंबा, कोकम, फणस इ. फळांचा प्रक्रिया उत्पादनांवर ५% दराने GST आकारणी करावी अशी मागणी जयंत देसाई यांनी केली आहे. यावेळी आंबा व्यावसायिक अमर देसाई आणि आनंद देसाई यांच्यासह अन्य व्यावसायिक उपस्थित होते.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here