नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी कुमार यांनी ऑलिम्पिक कोटा मिळविला. परंतु, गुरुवारी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत दोन्ही खेळाडूंचा पराभव झाला. रवीला 57 किलो वजनी गटात रशियाच्या झूर उगियेने 6-4 ने पराभूत केले. दुसरीकडे, 65 किलो वजनी गटात बजरंगवर दौलत नियाझबीकोव्हने मात केली. रवि आणि बजरंगच्या आधी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ही ऑलिम्पिक कोटा मिळवण्यात यशस्वी ठरली होती. तत्पूर्वी, क्वार्टरफाइनलमध्ये बजरंगने सोन जोंगचा 8-1 असा पराभव केला होता. तर, प्री-क्वार्टर फायनलमध्ये त्यांने स्लोव्हाकियाच्या डेव्हिड हॅबॅटवर 3-0 ने विजय मिळवला होता. या स्पर्धेत गेल्या वेळी बजरंग पुनीया रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी झाला होता. रवि कुमारने पहिल्या फेरीत कोरियाच्या किम सुंग गॉनचा 11-0 असा पराभव केला. तर, दुसर्या फेरीत त्याने युरो चॅम्पियन आर्मेनियाच्या आर्सेन हारुतुन्यानचा 18-6 अशी मोठ्या फरकाने मात केली. रवीने तिसर्या फेरीत जपानच्या युकी तकाहाशीचा पराभव केला. त्याने हा सामना 6-1 असा जिंकला.
