कुंभवडे, जुवाठी, विखारेगोठणेसह विलये ग्रामस्थ जमीन देण्यास तयार : कोकण जनकल्याण समितीची बैठक

0

राजापूर : रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांच्या प्रकल्पग्रस्त भागातील डोंगरतिठा येथील जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठी चौदा गावांतून अधिकाधिक संमती मिळवण्याचा निर्णय घेण्यात आला, सद्यस्थितीत चौदा गावांतील आठ हजार एकरपेक्षा अधिक जमीनमालकांनी नाणारच्या रिफायनरीसाठी आपली संमतीपत्रे दिली असून ही संमतीपत्रे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहेत.

गुरुवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत नाणार प्रकल्पाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असल्याने अनुकुलता दर्शवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आ.नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. या बैठकीबद्दल बोलताना कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी सांगितले की, नाणार प्रकल्पासाठी ज्या आठ हजार एकरपेक्षा अधिक जमीनमालकांनी संमती दिलेली आहे. त्यामध्ये एक गुंठा जमीन देखील इन्व्हेस्टर लोकांची नाही आहे. एवढेच नव्हे तर प्रकल्पग्रस्त चौदा गावांव्यतिरिक्त लगतच्या प्रकल्पग्रस्त नसलेल्या कुंभवडे, जुवाठी, विखारेगोठणे गावांतील जनतेने तर आम्ही आमची जमीन देण्यासाठी तयार आहोत आमचा प्रकल्पग्रस्त गावांत समावेश करा अशी मागणी केली आहे. लगतचे विलये गावातील शंभर टक्के ग्रामस्थांनी आपली जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. डोंगरतिठा येथे झालेल्या प्रकल्पसमर्थक पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला कोकण जनकल्याण समितीचे सचिव अविनाश महाजन तसेच पदाधिकारी प्रल्हाद तावडे, सदाशिव तांबडे,अविनाश पाटणकर,विद्याधर राणे, सुहास मराठे व अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here