ह्युस्टन – अमेरिकेत होणाऱ्या Howdy Modi कार्यक्रमावर आता सर्वांची नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. Howdy Modi या कार्यक्रमात अमेरिकेत राहणारे सुमारे 50 हजारपेक्षा जास्त भारतीय सहभागी होणार आहेत. मेगा इव्हेंट असणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अनिवासी अमेरिकन भारतीयांच्यापुढे भाषण करणार आहेत. Howdy हे इंग्रजी How do you do या प्रश्नार्थक वाक्याचे संक्षिप्त रुप आहे. जसे अनेक शब्द आपल्या भाषेतून लुप्त होत आहेत तसाच हाऊडी हा शब्दही अमेरिकन समाजाच्या प्रचलनातून लुप्त होत आहे. मात्र अमेरिकच्या दक्षिण भागातील अनेक प्रांतांमध्ये हा शब्द अजूनही वापरला जातो. Howdy Modi कार्यक्रमाचे आयोजन टेक्सास इंडिया फोरमच्यावतीने करण्यात आले आहे. टेक्सास इंडिया फोरम ही एक ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे. भारत आणि अमेरिकेतील सहयोग वाढवण्याचे ही संस्था काम करते. हाउडी मोदी कार्यक्रमासाठी 1,000पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. तसेच टेक्सासमधील 650 वेलकम पार्टनरनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. किती वाजता सुरु होणार हा कार्यक्रम (Howdy Modi Timing) स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे तर दुपारी एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. कार्यक्रम स्थळाचे गेट सकाळी १० वाजेपर्यंतच उघडे राहील. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल आणि रात्री साडेदहा वाजता संपेल. या कार्यक्रमात ट्रंप यांच्याबरोबर अमेरिकेतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. येथील एनआरजी स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या 22 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. हाउडी मोदी कार्यक्रम अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधासाठी महत्वपूर्ण असणार आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंधांना बळकटी देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला दोन्ही देशांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याने त्याला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. व्यापार संबंधाच्या अनुषंगाने दोन्ही देशांच्या अधिकारी पातळीवर तणावपूर्ण चर्चा झालेली आहे. तसेच काश्मीर संबंधात विविध वक्तव्येही दोन्ही बाजूने झाली आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही देशातील तणाव दूर करण्याच्या दृष्टीनेही या कार्यक्रमाकडे पाहण्यात येत आहे. यानिमित्ताने होणाऱ्या दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या बैठकीपूर्वी एका महत्वापूर्ण कराराला मूर्त स्वरुप देण्याचाही अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. भारताने लावलेल्या अमेरिकी उत्पादनांच्यावरील कराला ट्रंप यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे दोन्ही देशात व्यापार पातळीवर तणावर होता. त्यावर यानिमित्ताने उपाय मिळण्याची शक्यता आहे.
