कोकणातील पर्यटनाला व्यापक चालना देणार : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

0

मुंबई : कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गुरुवारी पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यासंदर्भातील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकणात पंचतारांकीत हॉटेल्स गुंतवणूक करीत आहेत. यापुढील काळातही कोकणाच्या पर्यटन विकासासाठी शासनामार्फत व्यापक कार्य केले जाईल, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत, खासदार श्री. विनायक राऊत, आमदार श्री. दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक श्री. धनंजय सावळकर उपस्थित होते. आमदार योगेश कदम, रत्नागिरी व सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोकणात बीच शॅक टुरीजम, टेंट टुरीजम, कॅराव्हॅन टुरीजम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. दर महिन्याला बैठक घेऊन कोकणाचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देऊ, असे ते म्हणाले. मंत्री श्री. उदय सामंत म्हणाले की, कोकणातील साने गुरुजी यांचे स्मारक, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक आदी कामांना मंजुरी देऊन त्यास गती देण्यात यावी. त्याचबरोबर कोकणासह राज्यातील किल्ल्यांच्या विकासाला चालना देण्यात यावी. दुबईच्या धरतीवर कोकणामध्ये ग्लोबल व्हीलेजसारखा पर्यटन उपक्रम राबविता येऊ शकेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही आज मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस महसूल आणि ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार, आमदार श्री. अंबादास दानवे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक श्री. धनंजय सावळकर उपस्थित होते. औरंगाबाद जिल्हाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणारे रस्त्यांचे जाळे मजबूत असावे. सर्व रस्ते दर्जेदार कसे होतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. पर्यटकांसाठी शहरात सुरु करावयाच्या हॉप ऑन, हॉप ऑफ वाहतूक व्यवस्थेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरुळ ही दोन्ही जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळे आहेत. औरंगाबाद-फर्दापूर-अजिंठा लेणी यासह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जेदार विकास होणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आदी संबंधीत यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा मानस असून शिवरायांच्या कार्यातून युवा पिढीला प्रेरणा मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी चालना देण्यात यावी. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा अधिक विकास होणे, त्याचबरोबर त्यांची प्रचार-प्रसिद्धी होऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसी आणि पर्यटन विभागामार्फत चालना देण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:10 AM 18-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here