मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून शरद पवार यांना मोठा धक्का दिला. अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला भावी काळात मोठी गळती लागण्याचे संकेत आहेत. शरद पवार आपल्या हृदयात असले तरी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणास शिवसेनेत आलो आहोत, असे अहिर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काल रात्री उशिरा सचिन अहिर यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना या निर्णयाची कल्पना दिली आणि लगोलग आज सकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्या प्रवेशामागे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची रणनीती असल्याचे मानले जाते. याशिवाय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांनीही अहिर यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. सचिन अहिर हे भायखळा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे मुंबईतील अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले की, शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम राहील, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीचे राज्यभरातील असंख्य कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून त्यांचा मला पाठिंबा आहे असे सांगताना आम्हाला कोणताही पक्ष फोडून शिवसेना वाढवायची नाही तर स्वबळावर शिवसेनेचा विस्तार करायचा आहे, असे ते म्हणाले.
आपल्या निर्णयाबद्दल आपण शरद पवार यांना कल्पना दिली नाही, असे सांगताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मात्र आपला हा निर्णय सकारात्मक असल्याचे मत खासगीत आपल्याकडे व्यक्त केले आहे, असा दावा अहिर यांनी केला. दरम्यान, आपण शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी संस्कृती गहाण ठेवत नाही. सद्सद् विवेकबुद्धी गहाण गहाण ठेवणार नाही असे सांगताना अनेक चांगले लोक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी बोलताना अहिर यांनी आदित्य ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले. आदित्य यांच्याबरोबर आपली गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती आणि त्याला आता मूर्त स्वरूप आले आहे, असे ते म्हणाले. अहिर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे काटे मोडले आहेत का असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काटे मोडत नसून घड्याळाला फक्त चावी देतो.
