गावागावातील डिसले गुरुजी शोधा

0

✍️ शिरीष दामले, रत्नागिरी

➡️ डिसले गुरुजी यांच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानसन्मानाचे कोंदण मिळाले. त्यानिमित्ताने शिक्षकांची वाहवा झाली. या पद्धतीने तळमळीने काम करणारे छोटे छोटे डिसले गुरुजी ग्रामीण भागात पसरलेले आहेत. त्यांच्यातील प्रयोगशीलता व तळमळ हेरून त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. डिसले यांना विधान परिषदेत पाठवण्याची सूचना करण्याचा अतिउत्साह करण्यापेक्षा त्यांना वर्षभर त्यांचे काम दूरवर नेण्याची संधी द्यावी. त्यामुळे गावोगावच्या शिक्षकांचा फायदा होईल.
डिसले गुरुजींच्या कर्तृत्वाबद्दल भाष्य करताना गुरुजी दिसले असे यथार्थपणे म्हटले गेले. यात शब्दच्छल थोडा अन गुरुजी जाणवले असा त्याचा अर्थ. ‘असे डिसले गुरुजी’ छोट्या छोट्या प्रमाणात प्रामुख्याने दुर्गम भागात दिसून येतात. त्यांच्या आंतरिक तळमळीला आता तंत्रज्ञानाचे साह्य मिळते. मुले शिकत का नाहीत, यावर शिक्षक शिकवतात म्हणून असे उत्तर जाणकारांकडून फार लवकर दिले गेले आहे. अपेक्षा अशी आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत शिकत राहिले पाहिजे. यातील तत्त्व काय हे शिक्षकांनी समजून घेतले की डिसले गुरुजी तयार होतात. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिकवणारेच नव्हे, तर त्यांच्यासोबत शिकणारे शिक्षक आहेत. गेल्या तीन वर्षांत ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकांमधील अनेक गुरुजींच्या कहाण्या याची साक्ष देतील. डिसले गुरुजींचा योग्य सन्मान करायचा तर ग्रामीण भागातील छोट्या छोट्या डिसले गुरुजींचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयोगशील शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक, शिकवण्यासाठी तंत्र वापरणारे शिक्षक अशांची यादी बनवून त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. आदर्श म्हणून निवड करताना जो घोळ घातला जातो, त्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे ठरेल. त्या शिक्षकांनी केलेल्या प्रयोगांचे आदानप्रदान झाले तर त्याला व्यापक रूप मिळू शकेल.
याबाबत एक आठवण सांगणे योग्य ठरेल. रत्नागिरी जिल्हा परिषदेने पहिलीपासून इंग्रजी असे धोरण राबवले. असे करणारी ही पहिली जिल्हा परिषद. यासाठी अभ्यासक्रम आणि पुस्तिकाही बनवली. प्रयोगशील शिक्षकांनी आपापल्या पद्धतीने दुर्गम ग्रामीण कोकणातील मुलांना इंग्रजी शिकवण्याचे प्रयोग केले. गणपतीपुळे नजीकच्या सैतवडे गावात मागासवर्गीय शिक्षक पती-पत्नीने प्रयोग यशस्वी केला होता. दुर्दैवाने हे धोरण अंगीकारण्यापेक्षा खासगी शाळांची धन होईल, असे निर्णय झाले.
कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षण नेणारे गुरुजी आहेतच. वाड्यावाड्यांवर जाऊन तेथे मुलांना शिकवणार्‍या गुरुजींच्या तळमळीवर ‘सकाळ’ने याआधीही प्रकाश टाकला आहे. त्यांचा वकूब आणि पोच भले डिसले गुरुजींपेक्षा कमी असली तरी तळमळ तेवढीच आहे. दापोलीसारख्या शहरातून स्वतःच्या मुलाला आपण ज्या खेड्यात शिकवतो, तेथील शाळेत घालून त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी चाकोरीबाहेर प्रयत्न करणारे शिक्षक आताही आढळतात.
शिक्षकांची प्रयोगशीलता वा त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यात, त्याचबरोबर कामचुकार आणि उचापतखोर शिक्षकांना चाप लावण्यातही समाज कमी पडतो. अधिकारी आणि पुढारी शिक्षकांच्या बदल्या, समायोजनात शिक्षकांकडून पैसे खायला कसे मिळतील या पद्धतीने त्यांना त्रास देणे, या ना त्या कारणाने जेरीस आणणे यातच रममाण असतात. सत्ताधारी वा पुढार्‍यांच्या आसपास घोटाळून आदर्श ठरवून घेणार्‍या शिक्षकांचा एक वर्ग आणि प्रामाणिक, निरलस काम करणार्‍या शिक्षकांचा एक वर्ग अशी विभागणी कोकणात तरी दुर्गम भागात दिसते. छोटे छोटे डिसले गुरुजी अवमानित झाले नाहीत आणि त्यांना प्रोत्साहन मिळाले तर असे अनेक प्रयोग यशस्वी होऊ शकतील.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here