समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणीला हातखंबा येथून सुरूवात

0

रत्नागिरी : समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणीला शुक्रवारी हातखंबा येथून सुरवात झाली. हॉटेल अलंकार येथे समारंभपूर्वक सुरू झालेल्या दौऱ्यापूर्वी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संजय यादवराव यांनी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. मुंबई ते गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकर व दर्जेदारपणे पूर्ण होण्याकरिता हा दौरा सुरू झाला आहे.

कोकणातील महामार्गाच्या दहा वर्षे रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुराव्यासाठी गेल्या ७ डिसेंबरपासून समृद्ध कोकण महामार्ग अभियान सुरू झाले. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासीयांच्या समितीने हा अभ्यासदौरा सुरू केला आहे. कोकणात दर्जेदार हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे, अशी कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांची भूमिका आहे. कोकणामधील महामार्ग म्हणजे खड्डे महामार्ग असून यावर गेल्या दहा वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या हजारो कोकणी बांधवांना श्रद्धांजली वाहून कोकण हायवे समन्वय समितीच्या ‘समृद्ध कोकण महामार्ग अभियान’ या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात झाली. राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून कोकणावर अन्याय होत आहे. गणपती आणि अन्य उत्सवांच्या निमित्त कोकणात आपल्या गावी जाणारे हजारो कोकणी बांधव आजपर्यंत या रस्त्यावर मृत्युमुखी पडले. पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागण्यास हा रेंगाळलेला महामार्ग कारणीभूत आहे. उत्कृष्ट दर्जाच्या आणि देशातील सुंदर समृद्ध कोकण महामार्गासाठी सातत्यपूर्ण अभियानाचा संकल्प करण्यात आला आहे. देवभूमी कोकणात दर्जेदार कोकण हायवे हा आमचा अधिकार आहे आणि त्याचे अभियान आता सुरू झाले आहे. ओपन हायवेवर असंख्य समस्या आहेत. त्या संपूर्ण माहितीचे संकलन कोकण हायवे समन्वय समिती करणार आहे. जेवढा पाऊस मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पडतो, तेवढाच कोकणात पडतो. मग दर वर्षी कोकण महामार्गावर दोन-चार फुटांचे खड्डे कसे काय पडतात, सहा महिने खड्ड्यांचा रस्ता आणि मग सहा महिने चांगला रस्ता असे किती वर्षे चालणार, असा सवाल संजय यादवराव यांनी केला. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावी, एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण करावा, असे आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:50 AM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here