चिपळूण : चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भिती वाटते. खेकडा हा किती महत्वाचा प्राणी आहे. जेव्हा २३ जणांचा निष्पाप बळी जातो आणि हे जबाबदार लोक सांगतात की खेकड्यांनी धरण फोडलं. त्यामुळे नागरिकांनी जागरूक होवून या लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत जागा दाखवावी, असे मत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा काल, शुक्रवारी (दि.२०) चिपळूणमध्ये आली होती. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर प्रखर टीका केली. यावेळी बोलताना खा. कोल्हे म्हणाले, चिपळूण येथे सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना जलसंपदामंत्र्यांकडून खेकड्यांनी धरण फोडलं असे विधान केले जाते. १० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. ती गोष्ट होऊ नये म्हणून मतदारांनी जागरूक व्हायची वेळ आली असल्याचे कोल्हे म्हणाले. जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांमुळे पडले असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधीपक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेसह सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी सर्वच वक्त्यांनी चिपळूणमध्ये शिवस्वराज्य यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल शेखर निकम यांचं कौतुक करत या मतदारसंघात आता परिवर्तन घडेल आणि शेखर निकमच आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.
