भाजपने स्वतंत्र लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या पाचही विधानसभा मतदारसंघातून भाजपाला गेल्या निवडणूकीत केवळ 1 लाख 27 हजार 277 इतकी मते मिळाली होती. इतक्या कमी प्रमाणात मते मिळवूनही रत्नागिरीत आलेल्या महाजनादेश यात्रेवेळी शक्ती प्रदर्शन घडवत भाजपच्या नेत्यांनी शिवसेना भाजप युती झाली नाही तरी स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले.रत्नागिरीच्या नूतन जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी अवघ्या आठ दिवसांत गावा-गावात जाऊन महाजनादेश यात्रेला आशीर्वाद देण्यासाठी साद घातली. त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसादही मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नुकतीच रत्नागिरीत येऊन गेली.यावेळी  भाजपने शक्तीप्रदर्शन केले. रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये हे शक्तीप्रदर्शन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे म्हणावे तसे वर्चस्व नाही. मात्र,दोन महिन्यांपूर्वी अ‍ॅड.दीपक पटवर्धन यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व सहकारी पदाधिकार्‍यांना संघटन बळकट करण्यासाठी प्रवृत्त केले. भाजपची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत येण्यापूर्वी केवळ आठ दिवस अगोदर रत्नागिरी तालुकाध्यक्ष म्हणून नगरसेवक सुशांत चवंडे यांची नियुक्ती केली. या नूतन तालुकाध्यक्षांनी रत्नागिरीतील गावागावत फिरून भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देत महाजनादेश यात्रा रत्नागिरीत येईल तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला येण्याचे आवाहन केले. प्रत्येक  तालुक्यामध्ये अशा तर्‍हेने भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून काम झाले. त्याचा परिणाम म्हणून महाजनादेश यात्रेवेळी युती झाली नाही तरी निवडणूकीला सज्ज आहोत हे दाखवून देणारे चित्र निर्माण करण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाचे फारसे वर्चस्व नाही. गेल्या विधानसभा निवडणूकीवेळी शिवसेना-भाजपाची युती नव्हती. त्यावेळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला 54 हजार 449, राजापूर मतदारसंघातून 9 हजार 953, चिपळूण मतदार संघातून 9 हजार 143, दापोली मतदारसंघातून 13 हजार 971 आणि गुहागर मतदारसंघातून 39 हजार 761 अशी एकूण 1 लाख 27 हजार 277 मते मिळाली होती. आता मात्र, हे चित्र बदलल्याची जाणीव झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील संघटन आणखी मजबुत करुन विकासासाठी निधी आणण्यास प्रयत्न करणार असल्याचे तालुकाध्यक्ष चवंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here