शृंगारतळी : स्वार्थासाठी सत्तेच्या वळचणीला जे गेले त्यांना इतिहास नसतो. जनतेला सोडून ज्यांनी दगाफटका केला त्यांना तर इतिहासच नाही. परंतु, एवढ्या कठीण परिस्थितीत आपण सर्वांनी जे उभे राहिलात त्यांना मी मानाचा मुजरा करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेले भास्कर जाधव यांच्यावर गुहागर येथील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान शाब्दिक हल्ला चढविला. ते पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे तुम्ही जाण्याचा विचार करीत होतात. परंतु, तुमच्या पोटातले ओठावर आले नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते. तुम्ही खाली ठेवलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा म्हणून आम्ही हाती घेतला आहे. तो अखेरपर्यंत ठेवू, असे घणाघाती विचार जयंत पाटील यांनी शृंगारतळी येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 20) आयोजित जाहीर सभेत मांडले. ते पुढे म्हणाले, हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने गुहागरमध्ये आलो होतो. मात्र, त्यावेळी आपल्या एका बाजूला खा. सुनील तटकरे तर दुसर्या बाजूला शेठ होते. त्यावेळी वाटले होते की, आता प्रतिकूल काळ आहे. सगळे मावळे साहेबांबरोबरच राहतील. जो अडचणीच्या काळात बरोबर राहतो तो शूर मावळा असतो. पण जो पळून जातो तो भित्रा असतो. असे भित्रे लोक शत्रूच्या सैन्यास जाऊन मिळाले आहेत. त्यांना येथून निवडून येऊ असे वाटत नाही त्यासाठीच ते पळून गेले आहेत. लोकसभेत भाजपचा मोठा विजय झाला. त्यामुळे अनेकांना आपल्या भवितव्याची भीती वाटत आहे. आपले काय होणार अशी शंका आहे. ज्यांना पवार साहेबांनी मानसन्मान दिला, मोठी पदे दिली असे अनेकजण त्यांना सोडून गेले. मात्र, अशांना धूळ चारण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे हे लक्षात घ्यायला हवे. गुहागरच्या जनतेने येथील गर्दीतून हे दाखवून दिले आहे.
