रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेस जनतेसोबतच

0

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट राहिली आहे. आम्ही प्रकल्प विरोधातील जनतेसमवेतच आहोत व यापुढेही राहू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजयराव भोसले यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.   मात्र, राष्ट्रवादीचे युवानेते अजित यशवंतराव यांचा रखडलेला  काँग्रेस प्रवेश तसेच त्यांनी  विधानसभा निवडणुकीतील  संभाव्य उमेदवारीसाठी   पक्षाकडे दिलेल्या मुलाखतीबाबत थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. राजापूर तालुका काँग्रेसची एक बैठक शहरातील नगर वाचनालयात पार पडली. त्यावेळी पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजयराव भोसले, अशोकराव जाधव, विधान परिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर व अन्य उपस्थित होते. मागील काही वर्षात पक्षाकडून या जिल्ह्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पक्षाचे नुकसान झाल्याची भावना नूतन जिल्हाध्यक्ष भोसले यांनी व्यक्त केल. मात्र, आता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार असून पक्षाला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे माजी युवक उपाध्यक्ष व युवा नेते अजित यशवंतराव हे काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्याबद्दल विचारले असता जिल्हाध्यक्षान्नी थेट उत्तर द्यायचे टाळले. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल, असे थातुरमातूर उत्तर देऊन त्यांनी प्रश्नाला बगल दिली. रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध करणार्‍या स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभा राहिल्याने यापुढेही आमची तशीच भूमिका राहिल, असे स्पष्ट करताना नाणारवरुन वेगवेगळी भूमिका घेणार्‍या शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला. सुरुवातील रिफायनरीबाबत विरोधी भूमिका घेणार्‍या शिवसेनेने आपली ती भूमिका बदलली असल्याचा टोला देखील काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी लगावला.
काँग्रेस राजवटीत विजेचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन अणुऊर्जा प्रकल्प आम्ही जैतापुरात आणला. मात्र, विद्यमान भाजप शासनाच्या काळात त्या प्रकल्पाचे काम कूर्म गतीने सुरु असल्याने काँग्रेस त्याबाबत सरकारला जाब विचारल्याशिवाय रहाणार नाही.असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले काँग्रेस पक्षात एकसंघता रहावी व पक्षाला चांगले दिवस यावेत म्हणुन आपण कार्यरत राहू अशी भूमिका काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here