भोम येथे खोटे संमतीपत्र करुन गावतळी चोरीला?

0

चिपळूण : तालुक्यातील भोम येथे खोटे संमतीपत्र करुन गावतळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्याच विहिरीवर गावतळीची मंजुरी घेऊन शासकीय निधी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत संबंधितांनी कायदेशिर प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत धोंडू भोने, रघुनाथ भोने, दत्ताराम भोने, सुरेश भोने (रा. भोम आदावडेवाडी) यांनी तक्रार नोंदवली आहे. याबाबत संबंधितांना कायदेशिर नोटीस बजावण्यात आली आहे. भोम येथील खासगी मालकीच्या जागेमध्ये खासगी विहिरीच्या जागी नवीन गावतळी दाखविण्याच्या उद्देशाने खोट्या व बनावट दस्तावेजानुसार शासकीय योजनेचा गैरफायदा घेत शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधित तक्रारदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पंचायत समिती व पाणीपुरवठा विभागाला निवेदने देण्यात आली असून हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघडकीस आला आहे. सरपंच मिलींद शिर्के, उपसरपंच वर्षा आदवडे,  ग्रामपंचायत सदस्य अरविंद भोने, चंद्रकांत भोने, वसंत भोने, धोंडू आदावडे, दिनकर बांद्रे तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांनाही या बाबत नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात तक्रारदार धोंडू भोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये शासकीय गावतळीची योजना राबवून तेथे असलेल्या विहिरीवर गावतळी दाखविण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी दुसर्‍याच जागेचे बक्षीसपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय निधीचा गैरवापर झाला आहे.  माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली असून दि. 29 ऑगस्ट 2005 रोजी भोम ग्रा.पं.ने ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत आदावडेवाडी येथे गावतळी बांधण्यास मंजुरी दिली. तक्रारदारांच्या जागेचे विरोधातील लोकांनी स्वत:च्या जागेचे खोटे व बनावट बक्षीसपत्र तयार करुन घेतले व त्यावर या जागेवर कोणाचा हक्क व हितसंबंध नाही असे लिहून दिले. शिवाय वाद निर्माण झाल्यास आपण जबाबदार राहू असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या बक्षीसपत्रातून शासनाची दिशाभूल झाली आहे. जागा मालकाच्या संमतीशिवाय जुन्या विहिरीवर तकलादू बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. पूर्वीपासून असलेली विहीर विनावापर पडून होती. त्यावर गावतळी दाखवून शासकीय निधी लाटण्याचा प्रकार आहे, असे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचे तक्रारदार भोने यांनी सांगितले.  या बाबत तक्रारदार भोने यांनी पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here