भाजप-सेना युतीची घोषणा घटस्थापनेला

0

मुंबई : जागावाटपासाठी शिवसेना आणि  भाजप यांच्या जोर-बैठका सुरूच आहेत. आमचा फॉर्म्युला लोकसभेच्या वेळीच ठरलाय. त्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कोणतीही खदखद नाही आणि गोंधळदेखील नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले; तर अजून कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पितृपक्ष असल्याने निर्णय घेणे टाळले जात असून नवरात्र सुरू होताच घटस्थापना की घटस्फोट, याचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत केवळ बैठकाच होतील, असे सांगण्यात आले. भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या (रविवारी) मुंबईत येत असून यावेळी ते उद्धव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज शिवसेना आणि भाजप यांच्या वेगवेगळ्या बैठकांचा सिलसिला सुरूच होता. उद्धव यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक शिवसेना भवनात घेतली. या बैठकीत त्यांनी युतीसंदर्भात मंत्र्यांची मते जाणून घेताना व्यूहरचना काय असावी याची चर्चा केली, असे समजते. आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना उद्धव यांनी शिवसेना भवनात बोलावून घेतले होते. तब्बल तासभर उद्धव ठाकरे यांनी या मंत्र्यांशी चर्चा केली. भाजपच्या नेत्यांशी फोनवर किंवा प्रत्यक्षरीत्या सुरू असलेल्या चर्चेची माहिती देताना सन्मानपूर्वक आणि समाधानकारक जागा मिळाल्या तरच युती करू; अन्यथा स्वबळावरच लढू, असे पक्षप्रमुख  यावेळी म्हणाल्याचे समजते. मात्र, त्यांचा सूर सकारात्मक होता, असे सूत्रांनी सांगितले. माझी भाजप नेत्यांबरोबर बोलणी सुरू आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सुभाष देसाई, अनिल देसाई आणि भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातदेखील चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या आहेत. आता भाजपने फार ताणून धरले नाही, तर पितृपक्ष संपल्यानंतर युतीची घोषणा होईल, असे उद्धव यावेळी म्हणाल्याचे एका मंत्र्याने सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मात्र, माध्यमांशी बोलताना युतीचा फॉर्म्युला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच मुख्यमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरला आहे,  असे स्पष्ट केले. दोघांनाही 135-135 जागांचा फॉर्म्युला केवळ मीडियानेच पसरवला आहे, असे ते म्हणाले. मात्र, येत्या दोन दिवसांत आमचा फॉर्म्युला जाहीर करू. तो आधी ठरल्यानुसारच असेल,  असेही उद्धव यांनी सांगितले.
पाच वर्षांत दगा दिला नाही राज्यात बहुमत नसतानाही भाजपने पाच वर्षे स्थिर सरकार चालवून दाखवले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केला होता. याबद्दल विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारकडे बहुमत नव्हते, हे खरे असले, तरी आम्ही पाच वर्षांत कधीही दगा दिला नाही, हेदेखील लक्षात घ्या. राजीनामे खिशात होते, ते कुठे गेले, असे आम्हाला विचारले जात होते. तो काही काळ सोडला, तर आम्ही पाचही वर्षे दगा न देता सरकारसोबत आहोत, असे उद्धव म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज नाहीत, असे स्पष्ट करताना युतीची घोषणा लवकरच होईल, असे ठाकरे यांनी सांगितले. नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून त्यास शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. स्थानिकांनी प्रकल्प स्वीकारायचे ठरवले तर आमचे काहीच म्हणणे नाही, असे उद्धव यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. राममंदिरासंदर्भात मोदी यांनी केलेले विधान म्हणजे मला टोला वगैरे काही नाही. सगळ्यांनाच कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आज प्रदेश कार्यालयात झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here