गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत

0

कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफिसमधील आर्थिक अपहारप्रकरणी संशयितांवर सोमवारपर्यंत गुन्हा नोंद करा, अन्यथा कुडाळ पोस्ट ऑफिस पुढील चार दिवसात उघडू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा आ. वैभव नाईक यांनी डाक प्रशासनाला दिला. आता डाक प्रशासन संबधित एजंटाविरोधात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करणार का? याकडे ठेवीदार व कुडाळवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ पोस्ट ऑफिसमधील अपहार प्रश्‍नी गेले 15 दिवस पोस्ट कार्यालयात तपासणी सुरू आहे. सर्वपक्षीय व खातेदारांनी पोस्ट अधिकार्‍यांना घेराव घालून जाब विचारत याबाबत माहिती घेत कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, तपासणी पूर्ण होवून तपासणीचा अहवाल गोवा येथील मुख्य कार्यालयात पाठवून त्या ठिकाणाहून गुन्हा नोंद करण्याबाबत आदेश आल्याशिवाय आम्ही गुन्ह्याची प्रक्रिया करू शकत नाही असे स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले. तरीसुध्दा लोकप्रतिनिधी व ठेवीदारांच्या संताप अनावर होईल याकडे लोकप्रतिनिधींनी  पोस्ट अधिकारी श्री. सरंगले यांचे लक्ष वेधताच, गेल्या 15 दिवसांचा अहवाल गोवा ऑफिसला पाठवून संशयितांवर तक्रारीबाबत कार्यवाही लवकर करून घेवू असे मंगळवारी सांगितले होते. दरम्यान आ. वैभव नाईक यांनी बुधवारी दुसर्‍यांदा पोस्ट कार्यालयाला भेट दिली. यावेळी कुडाळ पोस्ट ऑफिस  प्रवेशद्वारावरच थांबून त्यांनी पोस्ट अधिकारी जी.एस.राणे यांच्याशी चर्चा केली. त्या नंतर आ. नाईक यांनी सिंधुदुर्ग पोस्ट ऑफिसचा कार्यभार असणारे पोस्ट अधीक्षक रमेश बाबू यांच्याशी फोनवरून  चर्चा करून तपासाची गती वाढवा व संशयितांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. कुडाळ पोस्ट ऑफिसमधील आर्थिक अपहाराचा तपास नाही तर ऑडीट सुरू असल्याचे श्री. राणे यांना सांगून तात्काळ प्रत्येक खातेदारांची परिपूर्ण स्टेटमेंट घ्या, आवश्यक असल्यास  पोलिसांची मदत घ्या, आम्ही सुध्दा जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोलून घेतो असे सांगितले. खरं तर खरी जबाबदारी पोस्ट विभागाची आहे. जिल्हाधिकार्‍यांनी शेकडो एजंट जिल्ह्यात नेमले आहेत. पण ते एजंट चांगल्याप्रकारे पोस्टाचे काम करतात का? हे पाहणे पोस्ट विभागातील अधिकार्‍यांचे काम आहे. त्यामुळे कुडाळ पोस्ट ऑफिसमधील अपहारामध्ये एजंट आणि कर्मचारी या दोघांवर कारवाई व्हावी. शेवटच्या खातेदाराचे पैसे कसे मिळतील? यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत.या प्रकरणात कुणीही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही, तसा कुणी प्रयत्न केल्यास आम्ही खपवून घेणार नाही असे आ. नाईक यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक श्री. शंकर कोरे यांचेही आ. नाईक यांनी याप्रश्‍नी लक्ष वेधत आवश्यक ते सहकार्य करा अशा सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here