कोकणात भाजपकडून ‘कुणबी कार्ड’ची चाचपणी सुरू

0

चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरुन युतीला ग्रहण लागले असले तरी आघाडीची घोषणा झाली आहे. मात्र, अद्याप युतीबाबत वाटाघाटीच सुरू आहेत. युतीचा निर्णय प्रलंबित असल्याने शिवसेना-भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपकडून ‘कुणबी कार्ड’ची चाचपणी सुरू आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. सुमारे 60 टक्क्यांहून अधिक कुणबी मतदार या दोन जिल्ह्यात येतात. या अनुषंगाने भाजपने कुणबी मतदारांना एकगठ्ठा करण्याचे काम सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघनिहाय कुणबी फॅक्टर महत्त्वाचा मानला जात असून समाजबांधवांमध्ये उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाली आहे. भाजपबरोबरच अन्य काही पक्षांनी देखील याच फॅक्टरला प्राधान्य दिले असून यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कुणबी फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणबी समन्वय समितीच्या मागणीची दखल घेत कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांची शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. शिवाय ही निवड जाहीर करताना या मंडळासाठी 50 कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. आघाडी शासनाच्या काळात शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले. मात्र, गेली अनेक वर्षे या आर्थिक विकास महामंडळासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नव्हती. अखेर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने समाजबांधवांमध्ये उत्साहाची लाट आली आहे. त्यामुळे युती फिस्कटल्यास भाजपने कुणबी फॅक्टरवर लक्ष केंद्रित केले आहे. कोकणात बहुसंख्य असलेला हा समाज आजपर्यंत शिवसेनेचा परंपरागत मतदार म्हणून ओळखला जातो. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी या मतदारांना संघटनेशी बांधून ठेवले. मात्र, त्यांच्या पराभवानंतर कुणबी समाजाचा नेता नाही अशी खंत समाजामध्ये आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कुणबी फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. युती फिस्कटल्यास गुहागर, चिपळूण मतदारसंघात अशा उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. त्या बरोबरच अन्य ठिकाणीही भाजपकडून काही नावांची चर्चा केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार असून सर्व गणिते युतीच्या निर्णयावरच अवलंबून आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघावर सद्यस्थितीत सेनेचे वर्चस्व आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत गुहागर व दापोलीत राष्ट्रवादीचे आमदार विजयी झाले. मात्र, आता भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर गुहागरमध्ये त्यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्यात सिंधुर्दु जिल्ह्यात नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात युतीची गणिते न  जुळल्यास भाजपकडून कुणबी समाजातील उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here