म्हैसूर : सलामी फलंदाज प्रियांक पांचालने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध दुसर्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी शतक झळकावले. तर, त्यामुळे भारत ‘अ’ संघाविरुद्धचा सामना ड्रॉ झाला. दोन सामन्यांतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे मालिका 1-0 अशी भारत ‘अ’ संघाने जिंकली. गुजरातचा फलंदाज पांचालने 192 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 70 षटकांत 3 बाद 202 धावा करीत डाव घोषित केला. पांचालने यादरम्यान दोन मोठ्या भागीदारी केल्या. त्याने सलामी फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (37) सोबत 94 धावांची भागीदारी केली व तिसर्या विकेटसाठी करुण नायरसोबत (नाबाद 51) 92 धावा जोडल्या. सेनुरान मुथूसामीने पांचालला बाद केले. मुथूसामी 2 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध खेळविण्यात येणार्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत राष्ट्रीय संघासोबत असणार आहे. सामन्याचा निकाल येत नाही असे दिसल्याने सामना ड्रॉ करण्यात आला. स्थानिक क्रिकेटमध्ये गेल्या काही सत्रांपासून खोर्याने धावा करणार्या पांचालने काही चांगले फटके मारले. यामध्ये चार षटकारांचा देखील समावेश आहे. पहिल्या डावात 78 धावा करणारा नायरदेखील फॉर्ममध्ये होता. पहिल्या डावात 92 धावांची खेळी करणार्या गिलने दुसर्या डावात फारशी चमक दाखवली नाही. त्याला डेन पीटने बाद केले. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 417 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका संघाने 400 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 161 धावांची खेळी करणारा एडन मार्कराम ‘सामनावीर’ ठरला.
