खारेपाटण : खारेपाटण परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या मालवाहक वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. सोमवारी खारेपाटण-माचाळवाडी येथील चंद्रशेखर शरद शिंदे यांच्या ट्रकमधून 14 हजार रु. किंमतीचे 200 लिटर डिझेल चोरीला गेले. त्यांनी गावातील लोकांकडे चौकशी केली असता पहाटे तिघेजण त्यांच्या ट्रकमधील डिझेल काढताना दिसून आले होते. याप्रकरणी चंद्रशेखर शिंदे यांच्या तक्रारीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील धनाजी आत्माराम चव्हाण (रा. खारेपाटण) याला अटक करण्यात आली. दरम्यान, ट्रकमधील चोरलेले डिझेल ज्या सुमोतून चोरून नेले जात होते, त्या गाडीचा फोटो काढल्याच्या रागातून धनाजी चव्हाण याने व्यापारी गुरुप्रसाद दीपक शिंदे (रा. खारेपाटण) यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी धनाजी चव्हाण याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून खारेपाटणमधील व्यापार्यांनी चव्हाण याच्याविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे कणकवली पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी ट्रकमालक चंद्रशेखर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी वैभववाडी येथील पंपावर ट्रकची टाकी फूल करून ट्रक खारेपाटण येथील सिंधुदुर्ग बँकेसमोर डांबरी रोडवर उभा करून ठेवला होता. ट्रकचे दोन्ही दरवाजे बंद करून त्याला कुलूप लावून ठेवले होते. सोमवारी सकाळी आपणांस कासार्डे येथून सांगली येथे वाळू नेण्याचे भाडे असल्याने त्यांनी सकाळी 7.30 च्या सुमारास ट्रक चालू केला असता डिझेल मीटरची पिवळी लाईट चालू झाली. त्यावेळी टाकीमध्ये डिझेल नसल्याचे त्यांना समजले. म्हणून स्टेअरिंगवरून खाली उतरून टाकीचा खालील नट हात लावून पाहिले असता तो सैल असल्याचे दिसून आले. कोणीतरी डिझेल चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गावातील लोकांकडे चौकशी केली असता गुरूप्रसाद शिंदे व सुहास राऊत यांनी त्यांना आम्ही पहाटे 4.15 च्या दरम्यान कोल्हापूर येथे खासगी वाहनाने जात असताना तुमच्या ट्रकजवळ धनाजी चव्हाण व शांताराम पांचाळ (दोन्ही रा. खारेपाटण) आणि प्रदीप मोरे (रा. भुईबावडा) हे ट्रकच्या टाकीतील डिझेल काढताना दिसून आल्याचे त्यांनी सांगितले . याबाबत या तिघांविरूध्द चंद्रशेखर शिंदे यांनी डिझेल चोरीची पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीला अनुसरून खारेपाटण पोलिस स्टेशनचे हवालदार अनमोल रावराणे यांनी खारेपाटण परिसरामध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता धनाजी आत्माराम चव्हाण याची गाडी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आली. परंतु हीच गाडी आहे का? या गोष्टीची खात्री करण्यासाठी खारेपाटणचे व्यापारी गुरुप्रसाद शिंदे यानी संशयित धनाजी चव्हाण यांच्या गाडीचे फोटो काढण्यास सुरुवात केली. सदरची बाब धनाजी चव्हाण याच्या लक्षात येताच त्याने आपल्या साथीदारांसह गुरुप्रसाद शिंदे यांच्या गाडीजवळ येऊन त्यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. सदरचा प्रकार गुरुप्रसाद शिंदे यांनी व्यापारी व ग्रामस्थांच्या कानावर घातला असता व्यापारी व ग्रामस्थांनी गुरुप्रसाद शिंदे यांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. दरम्यान कणकवली पोलिस व खारेपाटण हवालदार अनमोल रावराणे यांनी धनाजी चव्हाण याला डिझेल चोरी प्रकरणी ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुप्रसाद शिंदे यांना झालेल्या मारहाणी बाबतची तक्रारही कणकवली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. चंद्रशेखर शिंदे यांच्या तक्रारीवरून डिझेल चोरीप्रकरणी धनाजी आत्माराम चव्हाण, शांताराम पांचाळ आणि प्रदीप मोरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी धनाजी चव्हाण याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. तर गुरूप्रसाद शिंदे यांच्या तक्रारीवरून धनाजी चव्हाण याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात खारेपाटण व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थ आणि कालभैरव मंदिर ट्रस्टच्यावतीने कणकवली पोलिसांना निवेदन देण्यात आले. यात संशयित धनाजी चव्हाण हा खारेपाटणमधील बर्याच चोर्यांमध्ये संशयित असून खारेपाटणमधील एका व्यापार्याला त्याने केलेली मारहाण निंदनीय आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे व्यापार्यांनी केली. 2 जून रोजी झालेल्या कालभैरव मंदिरातील फंडपेटी चोरीप्रकरणी सुद्धा धनाजी चव्हाण हा संशयित म्हणून नमूद केलेला आहे. तसेच खारेपाटण, राजापूर, तळेरे व आजूबाजूच्या परिसरातील मालवाहू गाड्यांच्या डिझेल चोरी प्रकरणी धनाजी चव्हाण हा मुख्य आरोपी असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी खारेपाटणवासीयांच्यावतीने करण्यात आली. तशा स्वरूपाचे निवेदन कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांची भेट घेऊन देण्यात आले. खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कुबल, खारेपाटण शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रवीण लोकरे, खारेपाटण सोसायटीचे चेअरमन प्रमोद निग्रे, जि. प. सदस्य बाळा जठार, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेश गोडवे, मंगेश गुरव, सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, माजी सरपंच संदेश धुमाळे, गफार काझी, प्रदीप इस्वलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
