भुवनेश्वर : इस्रोच्या चंद्रयान २ मोहिमेतील संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरशी संपर्क पुन्हा स्थापित करण्याच्या आशा मावळल्या आहेत. विक्रम लँडर चंद्राच्या ज्या भागात आहे त्या भागात आता १४ दिवसांनंतर अंधार पडण्यास सुरुवात झाली आहे. विक्रम लँडरशी ७ सप्टेंबर रोजी लँडिंगच्या आधी काही क्षण संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोकडे संपर्कासाठी पुढचे १४ दिवस होते. आज हे १४ दिवस संपत आहेत त्यामुळे आता संपर्काच्या आशा जवळपास मावळवल्या आहेत. इस्रोचे प्रमुख सिवन यांनी भुवनेश्वर येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रयान २ मोहीम ९८ % यशस्वी झाली असल्याचे सांगितले. तसेच सर्वप्रथम आम्हाला लँडरबाबत काय झाले आहे हे शोधावे लागेल. आता हीच प्राथमिकता आहे. ऑरबिटरचे काम जसे अपेक्षित होते तसेच सुरु आहे. ऑरबिटरमध्ये एकूण आठ उकरणे आहेत ती सर्व उत्तम काम करत आहेत. असे त्यांनी सांगितले. आता विक्रम लँडर ज्या भागात आहे त्या भागात अंधार पडायला सुरुवात झाली आहे. रात्री चंद्रावरील तापमान उणे २०० डिग्री सेल्सियसच्या खाली जाते. या तापमाणात विक्रम लँडर टिकू शकणार नाही. यामुळे विक्रमशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. इस्रोबरोबरच विक्रम लँडरशी संपर्क होण्यासाठी नासानेही प्रयत्न केले होते. त्यांनी त्यांच्या ऑरबिटरला विक्रम लँडर जेथे उतरणार होते त्याचे फोटो काढण्यास सांगण्यात आले होते. पण, हा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. सिवन यांनी चंद्रयान २ नंतर इस्रो गगनयान ही महत्वकांक्षी मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत भारतीय बनावटीतच्या यानातून तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणार आहे. सिवन म्हणाले की ही मोहीम पुढच्या वर्षी पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे यासाठी आम्ही विविध पर्यायाची चाचपणी करत आहोत.
