रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी गुहागर तालुक्यातील नरवणे-भंडारवाडी येथील एका घरात छापा टाकून देशी-विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त केला. ३ लाख ३ हजार ९१२ रुपये किमतीचे मद्याचे ४९ बॉक्स आणि २ लाख २५ हजारांची कार असा एकूण ५ लाख २८ हजार ९१२ एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करत प्रवीण पांडुरंग जाधव (वय ४४) याला ताब्यात घेण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त वाय.एम. पवार आणि कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या अधीक्षका संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १९ रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०१९ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी नाके व गस्ती मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला गोपनीय बातमी मिळाली होती. त्यानुसार गुहागर तालुक्यातील नरवण भंडारवाडी येथील एका घरात छापा टाकून देशी-विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त केला.
