अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार : इशांत शर्मा

0

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करून देण्याचे कडवे आव्हान रहाणेसमोर असेल. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची ही कठीण परीक्षा असेल. मात्र यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. रहाणे गोलंदाजांना प्राधान्य देणारा कर्णधार असल्याचे सांगत इशांतने त्याच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती केली. इशांत शर्मा अजिंक्य रहाणेबद्दल म्हणाला, “तो कायमच गोलंदाजांना प्राधान्य देणारा कर्णधार आहे. मी ज्यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे, तेव्हा प्रत्येकवेळी त्याने माझ्याशी विचारविनिमय करून निर्णय घेतले आहेत. तो नेहमीच त्याच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षण कसे लावायचे, याबद्दल विचारतो. त्याने मला अनेकदा केव्हा गोलंदाजी करण्याची इच्छा आहे, हेदेखील विचारले आहे. त्यामुळे मला वाटतं की तो खऱ्या अर्थाने गोलंदाजांचा कर्णधार आहे.” विराट कोहलीच्या उपस्थितीतही रहाणे गोलंदाज आणि कर्णधारांमध्ये संवाद कायम राहील, ह्याकडे लक्ष ठेवतो, अशी पुस्तीही इशांतने जोडली. अजिंक्य रहाणे मैदानावर कायमच संयमी आणि शांत असल्याचे दिसून येते. रहाणे आपल्या भावनांचं प्रदर्शन मैदानावर करत नाही. याबाबत विचारले असता इशांत म्हणाला, “अजिंक्य मैदानावर नक्कीच शांत असतो. किंबहुना विराटच्या तुलनेत तर ते अधिकच जाणवते. परंतु, अजिंक्यमध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. आखलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याची कला त्याच्याकडे आहे. तो मैदानावर शांत दिसत असला तरी मैदानाबाहेर तो हास्यविनोदात नेहमीच सामील असतो. पण त्याच्या शांत स्वभावामुळे मैदानात दबावाची परिस्थिती असली तरी संघ समतोल पद्धतीने ते हाताळू शकतो.” इशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील कसोटी मालिकेला मुकला आहे. पण त्याच्या या कौतुकामुळे रहाणेच्या अंगावर नक्कीच मूठभर मांस चढले असेल. याच कौतुकाला जागून उर्वरित मालिकेत भारतीय संघाची बुडती नौका अजिंक्य रहाणे तारून नेऊ शकतो का, याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:57 PM 23-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here