जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या विरोधात ३० सप्टेंबरला अविश्वास सभेचे आयोजन

0

रत्नागिरी : जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी, सदस्य यांच्यातील संघर्ष आता अंतिम टप्यात येवून ठेपला आहे. अविश्वास ठरावासाठी ३० सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आता अविश्वास ठरावाचं वादळ अटळ आहे. सध्या जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी विरूद्ध पदाधिकारी असा संघर्ष तीव्र झाला आहे. विशेषकरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात पदाधिकारी व सदस्य यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शेवटी पदाधिकारी व सदस्यांनी अविश्वास ठरावाचं अस्त्र हाती घेतलं आहे. सत्ताधाऱ्यांनी – यामध्ये पुढाकार घेवून अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यात सेनेच्या ३८ सदस्यांनी अविश्वास ठराव टाकण्याबाबत निवेदन जि.प.अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्याकडे सादर केले होते. हे निवेदन अध्यक्ष स्वरुपा साळवी यांनी प्रशासनाला सादर केले व विशेष सभा लावण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दुपारी १२ वाजता छत्रपती सभागृहात सुरू होणार आहे. या सभेत अविश्वास ठराव टाकण्यात येणार आहे. नियमानुसार या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी आंजल गोयल यांच्या विरोधातील नेमके कोणते आरोप असणार आहेत याचे वाचन सत्ताधाऱ्यांना करावे लागणार आहे. यानंतर यावर चर्चा केली जाईल. समजा विरोधकांनी यावर आक्षेप घेतला तर अविश्वासासाठी मतदान होईल. त्यानंतर हा ठराव शासनाकडे पाठवला जाणार आहे. आता अविश्वासाची तारीख निश्चित झाली असली तरी तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाली तर ही सभा रद्द करण्यात येईल. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी बदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जि.प.भवनात सुरू आहे. यापूर्वीही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या विरोधातही अविश्वास ठरावाचे वादळ निर्माण झाले होते. मात्र त्यावेळी देशभ्रतार यांची दरम्यानच्या काळात बदली झाली होती. यामुळे अविश्वास ठरावाची वेळच आली नाही.





LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here