नाणार प्रकल्प पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला तीव्र जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल

0

रत्नागिरी : नाणार रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध असून नाणार प्रकल्प पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला तीव्र जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, बहुजन आधाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा एका निवेदनाद्वारे बहुजन विकास आघाडीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. राजापूर तालुक्यातील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणार होता. मात्र, तेथील स्थानिक जनतेसह रत्नागिरी जिल्हावासियांनी प्रखर विरोध केल्याने, तो रद्द करण्यात आल्याचे राज्य शासनाने जाहीर केले व अध्यादेशही काढला. मात्र, नाणार परिसराबाहेरील काही लोकांनी या प्रकल्पाचे समर्थन केल्याने दि. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रा सभेत या प्रकल्प हवा असल्यास चर्चा करु, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप या परिसरातून उमटत आहेत. रिफायनरीला समर्थन करणाऱ्यांनी दोन हजार लोकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याकड़े दिल्याचे समजते. मात्र यावर विश्वास न ठेवता या विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे जिल्ह्यातील सुमारे २ लाख ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन जिल्ह्यात जनजागृती करुन मुख्यमंत्र्याना देणार असल्याचे बहुजन विकास आघाडीच्यावतीने सांगण्यात आले. शुक्रवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले. पुन्हा अध्यादेश काढल्यास जनतेच्या रोषाला व प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा बहुजन विकास आघाडीने दिला आहे. यावेळी अध्यक्ष सुरेश भायजे, जिल्हाध्यक्ष तानाजी कुळ्ये, नंदकुमार मोहीते आदि उपस्थित होते.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here