खेड : खेडमध्ये पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अनिकेत शॉपिंग सेंटर समोरील साई मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि. १८) मध्यरात्री फोडून तब्ब्ल सहा लाख रुपयांचे महागडे मोबाईल आणि इतर महागड्या वस्तूंची चोरी केली आहे. चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडले. मात्र, कॅमेराच्या डीव्हीआरमध्ये चोरट्यांचे चित्रण पोलिसांना मिळाले आहेत. या सीसीटीव्ही चित्रणाच्या साहाय्याने पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केला आहे. ही चोरी वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यालगतच झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खेड शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटर समोर असलेल्या ओम साई मोबाईल शॉपी बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी फोडली. छतावरून प्रवेश करून चोरटे आतमध्ये शिरले आणि शॉपीमधील विविध कंपनीचे महागडे मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेल्या आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेल्या ओम साई मोबाईल शॉपीचे मालक प्रवीण पवार यांना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ खेड पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या चोरी प्रकरणी रत्नागिरी येथून ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथक बोलाविण्यात आले आहे. या विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
